चंद्र

पौर्णिमेचा चंद्र
खुदू खुदू हसत होता
गुणगुणत गार वारा
झुल्यावरती झुलत होता...1

समुद्राच्या लाटा
बेधुंद नाचत होत्या
हातात हात घेऊन
दर्यागीत गात होत्या...2

चंद्र मात्र एकटा
लाटांचा खेळ पाहत होता
जग सार झोपी गेलं
आणि तो मात्र जागा होता....3

कोणीतरी किनाऱ्यावर
घर बांधून गेलं होत  
माती शंख शिंपल्याच 
ते महाल भासत होत...4

चंद्राकडे बघून लाटा
समोर जात होत्या
घराच्या जवळ जवळ
समोर सरकत होत्या...5

राजा राणीचं ते घर
लाटांमध्ये बुडणार होत
याचंच चंद्राला फार
दुःख वाटत होत...6

हसणारा चंद्र
रडूही शकत नव्हता
कदाचित अश्रूचा थेंब
घरावरतीच पडला असता...7

घरासाठी काहीही करायला
चंद्र तयार होता
समुद्री लाटांचा खेळ
त्याला नकोसा वाटत होता...8

चंद्राला स्वतःच्या उजेडाच
फार भय वाटत होत
अमावास्येला त्याला पडलेलं
पौर्णिमेच हे स्वप्न होत...9