कविता - शी वॉक्स इन ब्युटी (बायरन)

कितीबायरन या महान कवीची "She walks in Beauty" ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हा अगदी प्रेमात पडले होते. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतकी मंत्रमुग्ध का झाले होते पण तेव्हा "The best" वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका स्त्रीच्या पदन्यासाचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग मग जशी स्वतःची ओळख होत गेली लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे. "द्वैत आणि संतुलन यांच्या आपल्याला असलेल्या खोल आणि तीव्र आकर्षणामध्ये कुठेतरी या कवितेची गोडी दडलेली आहे.

 दुवा क्र. १

ही कविताच मुळी द्वैत या एका कन्सेप्टभोवती घट्ट विणली आहे. कवितेची सुरुवातच द्वैताने होते. कवितेतील रूपगर्विता पदन्यास करीत अवकाशाच्या तृतीय मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे जशी जणू काही चांदण्यांनी नटलेली रजनी ही पदन्यास करीत काळाच्या चतुर्थ मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे. हे कडवं पारलौकिक(? ) जगातील द्वैत दाखविते.

दुसऱ्या कडव्यातच संतुलनावर, समतोलावर बायरनने भर दिला आहे. कविताविषयाच्या लावण्याचे वर्णन करताना बायरन म्हणतो - तम आणि उजळपणा यांचा अलौकिक मेळ तिच्या लावण्यात साधला गेला आहे. एखादी तमाची छटा अधिक अंधारली असती अथवा उजाळ्याची छटा अधिक उजळली असती तर तिचे सौंदर्य कुठेतरी उणावले असते. अशा रीतीने दुसऱ्या कडव्यात  किती सुंदर रीतीने भौतिक जगातील द्वैत बायरन ने उलगडून दाखविले आहे. खरंच सहजसुंदर!!! केवळ महान कवीच ते करू जाणे.

पुढे पारलौकिक आणि भौतिक प्रतलावरील द्वैत मनःपातळीवर घेऊन जात बायरन मन आणि हृदय (Mind & Heart) कसे भिन्न आहेत हे सूचित करतो. या दोहोंच्या निर्मळतेमधून, विशुद्धतेमधून जे प्रतीत होते ते सौंदर्य येथे अपेक्षीत आहे. तिचे मन शांतीमध्ये वास करते तर हृदय आकंठ प्रेमात बुडून गेले आहे. ज्या व्यक्तीने केवळ चांगुलपणामध्ये दिवस कंठले आहेत केवळ अशा व्यक्तीस साध्य असे निर्मळ स्मितहास्य तिला वर म्हणून लाभले आहे.

अशा तीनही पातळ्यांच्या कसोट्यांवर सुंदर ठरलेली स्त्री त्याला सुंदर वाटते. या कवितेचा विशेष हा की कोठेही हा उल्लेख नाही की ही स्त्री बायरनची प्रेयसी आहे अथवा नाही. ते शेवटपर्यंत गूढच ठेवले आहे.