विडा

जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला. पण दर वेळेस परत दैवी कृपा होते आणि मी परत एखाद्या दिव्य स्तोत्रापाशी येऊन अडखळते.

यावेळेसही तेच झालं. जालावर फिरता फिरता हे अनवट सद्गुरू स्तोत्र वाचनात आलं. थोडसं मानसपूजा या प्रकारात हे स्तोत्र मोडतं. गुरुस भक्तीभावे अर्पण करावयाच्या त्रयोदशगुणी विड्याचे अत्यंत रसाळ वर्णन करणारे, सात्त्विक असे हे स्तोत्र आहे. त्रयोदशगुणीविड्यामध्ये पुढील १३ जिनसा वापरल्या जातात - चुना, कात, सुपारी, वेलदोडा, लवंग, बडीशोप, खोबरे, जायपत्री, ज्येष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर, खसखस. साक्षात आपल्या सद्गुरुला विडा भक्तीभावाने अर्पण करायचा तर तो कशा प्रकारच्या अष्टसात्विक गुणांनी युक्त असावा याचे अत्यंत काव्यात्मक दर्शन या स्तोत्रामधून घडते.

शिष्याचा स्वतःचा देह हेच जणू विड्याचे पान आहे. या पानामध्ये विवेकाची सुगंधी केशर-कस्तुरी, वैराग्याची कात, भक्तीरूपी चुना-सुपारी, भूतदयेची पत्री, शांतीरूपी वेलदोडा, आणि सत्क्रिया-क्षमारूपी बदाम, खोबरं, कंकोळ आदी जिनसा घालून मोठ्या प्रेमाने अर्पण करण्यात येणार आहे.राजस पदार्थ हे सात्त्विक गुणांबरोबर कल्पिल्याने अतिशय आगळंवेगळं सौंदर्य लेवून हा विडा आपल्या समोर येतो.

विडा घ्या हो स्वामी गुरुराया| तूची विश्रांतीची छाया||
अर्पितसे स्वीकार कराया|समर्थ तू योगीराया||धृ||
देह हे पिकले पान|त्यात घालोनी सामान||
त्रयोदशगुणीपूर्ण|विडा झाला प्रेमळ भजन||१||
केशर कस्तुरी विवेक|वैराग्याचा त्यात कात||
चुना भक्ती ही सुपारी|पत्री ही भूतदया||२||
शांती ही वेलदोडा|समाधान जायफळा||
बदाम खोबरे कंकोळ|क्षमा लवंग सत्क्रिया||३||
बालक दासाचा हा दास|प्रसादाची करी आस||४॥

विडासेवन झाल्यानंतर सद्गुरुंच्या विश्रांतीचा समय भक्त कल्पितो. त्यांची शेज निगुतीने, अष्टसात्विक भावाने आणि अत्यंत प्रेमाने तो तयार करतो. सर्वात प्रथम वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडून काढतो. त्यावर सत्प्रेमाचा शिडकाव करून नवविध भक्तीच्या पायघड्या घालतो. मंद अशा ज्ञानज्योतीच्या समया लावून, शेजेवर सुमनांची (श्लेष) पखरण करतो. कुठे दुर्बुद्धीच्या गाठींचे पडदे सोडून देतो तर कुठे साक्षात दया, क्षमा, शांती सामींची सेवा करण्यास तत्पर आहेत असे कल्पीतो. अशा रीतीने उन्मनी असे त्याचे स्वामी त्याने विणलेला अलक्ष भक्तीरूपी नाजूक शेला घेऊन निजले आहेत असे तो चिंततो.

आता स्वामी सुखे निद्रा करी अवधूता|सिद्धा अवधूता||
चिन्मय सुखस्वामी जऊनी पहुडा एकांता||
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला|
तयावरी सत्प्रेमाचा शिडकाव केला||१||
पायघड्या घातलिया सुंदर नवविधा भक्ती||
स्वामी नवविधा भक्ती||
ज्ञानाच्या समई उजळोनी लावियल्या ज्योती||२||
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगला|हृदयाकाशी टांगला|
मनाची सुमने करूनी केले शेजेला||३||
द्वैताचे कपाट लावूनी एकीकरण केले|एकीकरण केले|
दुर्बुद्धीच्या गाठी सोदूनी पडदे सोडीले||४||
आता तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला|स्वामी सांडूनी गलबला||
क्षमा दया शांती उभ्या सेवेला||५||
अलक्ष हा उन्मनी घेऊनी नाजूक हा शेला|स्वामी नाजूक हा शेला|
निरंजन सद्गुरू माझा स्वामी निजला शेजेला||६||