कोण मी?

कोण मी? (कॉफी पिणारा मी)

ना कुठला संत ना
हिमालयातला योगी मी
ना कामाचा गुलाम ना
व्यापारी, उद्योगी मी

ना जखमेवरची फुंकर ना
आल्हाददायक वारा मी
ना कोणाची अडचण ना
कोणासाठी सहारा मी

ना स्वत:भोवतीची भिंत ना
परक्या इमारतीची वीट मी
ना स्वत:ला घाबरणारा ना
मनाविरूध्द धीट मी

ना प्रेम करणारा हुशार ना
लोकांत रमणारा वेडा मी
ना पिंजऱ्यातला राजहंस ना
ओझी पेलवणारा रेडा मी

ना नशेत धुंद ना
शुध्दीत मस्त मी
पुरेशी कॉफी पिणारा
ना कमी मी, ना जास्त मी

कळलेच मला ना कधी
नक्की कोण आहे, कोण मी
शब्दांचा सुकलेला पाचोळा मी
का माझ्या विचारांचा द्रोण मी

-- मयुरेश कुलकर्णी