माणसे झाली 'प्रिय'

     नुकतेच एक कार्यालयीन पत्र आले. त्यात अपेक्षेप्रमाणे मायना ' डिअर सर' पासून म्हणजेच 'प्रिय सर' पासून सुरुवात होणारा होता. असे पत्र घेण्याचा काही पहिलाच अनुभव नव्हता. प्रेमळ सुरुवात झाली की, पत्र खाली ठेववत नाही, असा अनुभव आहे. नकोशा विषयावरचे असले तरी विषयात रस निर्माण होतो.   एकेकाळी खासगी पत्रात प्रियकर प्रेयसींनी एकमेकांना 'प्रिय' लिहितानाही पेन थरथरायचे आणि आता या 'प्रिय' ने कार्यालयात सर्रास येणे जाणे सुरु केले आहे.

    'प्रिय' सोबत 'हाय' चीही सुरुवात आय.टी.ने केली असावी. कार्यालयीन पत्रांची सुरुवात 'रिस्पेक्टेड सर' ने करावी, असा संकेत ऐकिवात होता. ज्यांच्याशी ओळख नाही, ज्यांचे वय माहीत नाही आणि ज्यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत अशांना 'माननीय सर' किंवा 'आदरणीय सर' म्हणूनच तो किल्ला सर करणे योग्य असे आम्हाला वाटत होते.  पण गेल्या काही वर्षांपासून कार्यालयीन पत्रांची आणि विरोपांची सुरुवात 'डिअर सर' अशीच होत आहे. जागतिकीकरणाचे जे काही चांगले (!) केले, त्यात माणसांना जवळ आणण्याचे एक महत्त्वाचे काम असावे. इतर क्षेत्रे हे उचलायला अजून धजावत नसावीत. अजूनही खूप ठिकाणी पत्रांतून आणि विरोपांतून अंतर राखून मान देण्याची पध्दत आहे. 
  व.पु.काळे यांचा काळ जागतिकीकरणापूर्वीचा. काळेंना  आलेल्या एका पत्राबद्दल त्यांनी  एके ठिकाणी लिहिले आहे. त्याचा आशय असा की, एका चाहतीच्या पत्राच्या उत्तरात मी तिला "प्रिय" संबोधले तर तिचा संतप्त दूरध्वनी आला. आपली ओळख नसताना मला प्रिय म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार होता, असा एकंदर तिच्या  हजामतीचा सूर होता.
  ही चाहती जर हल्लीची असती तर तिने "डिअर काले, थॅक्स फॉर युअर रिप्लाय...."अशीच सुरुवात केली असती.
  'माननीय, माननीय' करत करत विषय रेंगाळत ठेवण्यापेक्षा  पहिल्याच पत्रात सरांना  प्रिय करुन खिशात घालण्याची मस्त क्लृप्ती या नवा संगणकीय जगाने दिली आहे. अर्थात, प्रत्येकालाच ही जवळीक आवडेल असे नाही. 
  'डिअर' मुळे  बहुतेक सर खूष होत असावेत. 'डिअर' लिहिल्यामुळे एखाद्या मॅडम भडकल्या असेही उदाहरण ऐकले नाही बुवा अजून !