शीड

लोटले त्या सागराने, पोरका झाला किनारा

नाव नेली वादळांनी, शीड वारा मोडणारा.
बावल्यांशी खेळणारी, सावल्यांची जात वेडी
भेट होती का खरी ती, का तुझा तो खेळ सारा.
आसवांनी साठलेल्या, त्रास होतो आठवांचा
घेत होतो श्वास तेव्हां, आज घेतो फ़क्त वारा.
एकटा मी कोण माझे, का दिले टाकून ओझे
देह माझा गंजलेला, भंगलेला सात बारा.
चांदण्यांची रास होती, काजव्यांना आस मोठी
कंदिला का लाज वाटे, पाहताना हा पसारा.
दोन होते पार वेडे, रात्र सारी भांडणारे, 
या कुशीला झोप नाही, त्या कुशीला जागणारा.
एक होता मोगरा तो, एक हा निवडूंग आहे
कुंपणाचा हा मवाली, अंगणाचा तो दुलारा.
सुधीर ...
============================