ती येणार आहे ...!!

 
संध्याकाळ झाली आहे 
नि ती येणार आहे 
वाट बघतोय तो  तिची 
आतुरतेने ..चातकासारखी .!!
तिन्हीसांजा झाल्यात .....
पाखरांची भिरी घरी परततेय 
चुकून- माकून मागे राहिलेली 
 
आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम
पूर्वी किती  घायाळ व्हायचा तो 
तिच्या नुसत्या आठवणीने 
तिचा हलकासा वावर 
तिची लगबग 
तिने केलेला चहा  
देवाजवळ लावलेला दिवा 
कपाळावरची पिंजर 
सुख सुख निव्वळ .....
कसे असते हो ..?
 
पाखरे तर गेली उडून दूरदेशी 
आपल्या पोटापाण्यासाठी 
स्वताचे घरटे बनवून 
पण 
ती येणार आहे 
तो   वाट बघतो आहे तिची 
तो काही आणतो त्यात नाही वाटत त्याला  सुख 
तिने काही आणले तरी त्याचा जीव जातो हरवून  .
 
ती येणार आहे  
निळी आकाशी साडी 
नि कपाळावरचा घाम 
तो वाट बघतोय तिची 
कधीची केव्हाची 
संध्याकाळ झाली की तो वाट बघत बसतो 
तिच्या येण्याची 
ती येते आहे  ,येणार आहे 
तिची लागते त्याला चाहूल 
तिच्या अस्तित्वाची त्याला होत असते जाणीव 
कसे  असतील खोटे हे भास 
येईल ना ती ...
तो वाट बघतोय ...केव्हाची ..कधीची..!!!!