बोधकथा - ४

जंगलावरील चित्त्यांची जुलमी आणि अत्याचारी राजवट एकदाची संपली.

संपली म्हणजे काय, तर सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन, प्राणीशाहीच्या मार्गाने लढा
देऊन ती संपवली.

सर्व प्राणी म्हणजे कोण कोण?

त्यात सोंडा नि कान फलकावत चित्त्यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय साखळी
उपोषण करणारे हत्ती होते.

माणसांना चित्त्यांच्या गुहांची माहिती पुरवून त्यांचा (म्हणजे बहुतेक
वेळा चित्त्यांचा) गेम वाजवणारे कोल्हे आणि लालतोंडी माकडे होती.

चित्त्यांच्या पिलांवर दगडधोंडे फेकून त्यांना जायबंदी (वा परलोकवासी) करणारे
काळतोंडे हुप्प्ये होते.

'चित्ते, भांडवलशाहीचे बूर्ज्वा पित्ते' असा कलकलाट करून चित्त्यांचेच नव्हे तर
सगळ्या जंगलाचे डोके उठवणारे कावळे होते ('भांडवलशाही' आणि 'बूर्ज्वा' या
कावळ्यांच्या दृष्टीने सर्व जीवमात्रांत सगळ्यात खालच्या - अगदी माणसाच्याही
खालच्या - पायर्‍या होत्या).

"गरूडपक्षी हे सापांचे शत्रू, आणि ज्याअर्थी चित्ते गरुडांची शिकार करत नाहीत
त्याअर्थी ते गरुडांचे मित्र. शत्रूचा मित्र हा आपला शत्रू" हे तत्त्वज्ञान सापांना
पटवून चित्त्यांमध्ये सर्पदंशाने मृत्यू पावणार्‍यांची संख्या बघताबघता दहापट
करणारे लांडगे होते.

थोडक्यात, चित्ते सत्तेबाहेर (आणि लवकरच नामशेष) झाले. त्याजागी प्राणीशाही आली.
प्रत्येक प्राण्याला एक मत (मग तो उडणारा असो, बुडणारा असो, चालणारा असो वा
सरपटणारा असो) या तत्त्वावर वनचरप्रधानाची निवडणूक झाली.

मोहाची फुले खाऊन कायम झिंगलेल्या एका अस्वलाने ती जिंकली.

झाले असे, की चित्त्यांनी जाताजाता "निवडणुका आमच्या देखरेखीखाली होतील"
अशी पाचर मारली. सत्ता का काय ती लौकरात लौकर उपभोगायला अधीर झालेल्या सगळ्या
प्राण्यांनी ते झटपट मान्य केले.

निवडणुकीतील मतपत्रिका करताना चित्त्यांनी त्यांच्या अंकलिपीप्रमाणे "अ अस्वल, ब
बदक, क कावळा, ड डास" अशी मतपत्रिका तयार केली. पहिलीच निवडणूक असल्याने सर्व
प्राण्यांचा (उडणार्‍या, बुडणार्‍या, चालणार्‍या,  सरपटणार्‍या) असा ग्रह झाला की
आपण पहिल्याच नावावर शिक्का मारणे भाग आहे.

त्यामुळे इच्छा, अक्कल आणि शुद्ध यातील काहीसुद्धा नसताना अस्वलाला जंगलाचा
कारभार हाती घेणे भाग पडले. घेतलान बिचार्‍याने.

त्याने पहिले काम केले ते हे, की आपण भांडवलशाहीच्या साफ विरोधात आहोत हे
पहिल्याच प्राणीसभेत ठासून सांगितले. भानगड अशी होती, की रोज सकाळी मोहाच्या
फुलांचा पहिला झुबका रिचवेपर्यंत त्याचे डोके जाम ठणठणत असे. त्यात कावळ्यांचा
कलकलाट असला तर त्याला अगदी जीव द्यावासा वाटे. त्यापेक्षा कावळ्यांना आपल्याकडे
वळवून घेतलेले बरे असा विचार त्याने केला.

कावळ्यांनाही कुणीतरी त्यांच्याकडे (अखेर) लक्ष दिल्याने आनंद झाला. त्या भरात
त्यांनी अस्वलावर एक सोळा ओळी कविता (खरी क्रांतिकारक कविता सोळा आणि सोळा ओळींचीच
असते हे सूज्ञांस माहीत असेलच) पाडली आणि तिचे गायन सुरू केले. अस्वलाला 'मध नको पण
माणूस आवर' असे झाले. त्याला काय करावे ते सुचेना. अखेर लालतोंड्या माकडांच्या
सल्ल्याने त्याने कावळ्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला की या (वा
कुठल्याही) कवितेचे गायन वा ज्यातून मोठा आवाज उत्पन्न होईल अशी कुठलीही क्रिया
केल्यास अस्वल भांडवलशाहीला विनाशर्त पाठिंबा जाहीर करेल. काकगान कंठातच
कोमेजले.

अस्वलाने आपला तेवीस अमावास्यांचा कार्यकाल झुलत झुलत पूर्ण केला. त्याची
कारकीर्द कुठल्याही घोटाळ्याशिवाय पार पडली. कारण घोटाळा करण्यासाठी शुद्धीत असणे
गरजेचे असते.

"तू फक्त पुनर्निवडणुकीला हो म्हणण्यापुरते(च) शुद्धीत रहा, बाकीचे आम्ही काय
ते करतो" ही लालतोंड्या माकडांनी कोल्ह्यांच्या वतीने दिलेली खुल्ली ऑफर त्याने
डोळेही उघडण्याचे कष्ट न घेता नाकारली. 'प्रत्येक वनचरप्रधानाला निवृत्त झाल्यावर
एक मोहाचे जंगल तहहयात देण्यात यावे' हा ठराव पार झाला होता, त्यामुळे त्याला आता
परत दिवसातून काही तास तरी शुद्धीवर रहाण्याची गरज उरली नव्हती.

इथून पुढे मात्र वनकारण झपाट्याने घडत गेले. लालतोंड्या माकडांची साथ सोडून
कोल्ह्यांनी लांडग्यांसोबत युती केली आणि राज्य ताब्यात घेतले. निवडणुका कधी पार
पडल्या हे बहुतेकांना उमगलेच नाही.

अस्वलप्रतिनिधी एकगठ्ठा तिकडे वळले. कारण पहिल्या वनचरप्रधानाच्या नावाने
डोंगरांचे, झर्‍यांचे, दलदलींचे नामकरण करण्यासाठी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला रहाणे
गरजेचे होते.

हत्तींनी 'पुढल्या निवडणुकीत नक्की मतदान करायचे' असा निश्चय केला आणि कान हलवत
ते जंगलातल्या अंतर्भागात गडप झाले.

काळतोंड्या हुप्प्यांनी इकडून तिकडे नुसत्याच दाणदाण उड्या मारल्या. कोल्ह्यांनी
लगेच त्यांना वनचरसाम्राज्यसंरक्षक अशी पदवी देऊन वनातल्या फळझाडांचे संरक्षण
करायला पाठवले. चोराहाती जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्यामुळे चोर आणि जामदारखाना
दोघांचाही प्रश्न मिटला.

वाघ, बिबटे आणि सिंह यांना कोल्ह्यांनी भरपूर तृणभक्षी असलेला एक जंगलाचा भाग
कायमस्वरूपी दिला आणि त्यांचाही प्रश्न सुटला.

अशारीतीने कोल्ह्यांनी बहुतेकांची व्यवस्था लावली.

विरोधी पक्षात अचानक बसावे लागलेल्या लालतोंड्या माकडांच्या साथीला केवळ गाढव,
तरस आणि घुबड यांचेच प्रतिनिधी उरले. यातील गाढवांच्या प्रतिनिधीला माहीत होते की
गाढव हा कायमस्वरूपी विरोधी पक्षातला प्राणी आहे. तरसांना कोल्ह्यांनी हाडुतहुडुत
केल्याने ते (सध्यातरी) दुखावले गेले होते. आणि घुबडांना बिचार्‍यांना दिवसा दिसत
नसल्याने त्यांचा प्रतिनिधी चुकून इकडे आला होता.

कोल्ह्या-लांडग्यांनी मिळून वनकारभार सोयीसवलतीने हाकत नेला. पहिल्यांदा एक
कोल्हा वनचरप्रधान झाला. मग पुढच्या वेळेस एक लांडगा. असे आलटून पालटून चालू
राहिले. एवढाही त्रास नको म्हणून कोल्हा आणि लांडग्यांच्या संकरातून एक प्राणीजमात
निर्माण करावी आणि त्या जमातीनेच कायम वनचरप्रधान रहावे असाही एक बेत पुढे आला. पण
कोल्हा आणि लांडगीण की लांडगा आणि कोल्हीण हा वाद न सुटल्याने तो बेत काही पार पडला
नाही.

सतत विरोधी पक्षामध्ये बसून लालतोंड्या माकडांचा मात्र फारच हिरमोड झाला.
चित्त्यांविरुद्धच्या लढाईत ते कोल्ह्यांसोबत होते. आणि पहिल्या वनमंडळात
कोल्ह्यांच्या बरोबरीने अस्वलाने त्यांनाही मानाची पदे दिली होती. पण कोल्ह्यांनी
लांडग्यांसोबत युती केल्यावर लालतोंड्या माकडांना कुणी विचारेनासेच झाले.

कावळे त्यांना मोजीत नसत कारण कधीकाळी का होईना त्यांनी कोल्ह्यांबरोबर संग केला
होता. आणि कोल्हे हे भांडवलशाहीचे बूर्ज्वा समर्थक आहेत असे कावळ्यांचे ठाम मत
होते.

हत्ती त्यांचे आतल्या जंगलातले स्थान सोडून फारसे बाहेर येत नसत. आणि निवडणुकीत
कोल्हा-लांडगा युतीला मतदान करून परतत असत. त्यांच्या कळपाला वाटेल तेवढी
फळे खाण्याची सवलत देण्याचा काळतोंड्या माकडांना आदेश होता.

गाढवांचा काही उपयोग नव्हता कारण गाढवांना त्यांच्याकडे सत्ता आली तर काय करायचे
याचा धसका कायम होता. त्यांचा गटनेता 'गाढवांकडे सत्ता आली आहे' असे भयानक स्वप्न
पडून अनेक वेळेस खिंकाळत जागा होई.

तरस एव्हाना पाय ओढीत सत्ताधारी पक्षात गेले होते. लांडग्यांनी त्यांची समजूत
काढून त्यांना 'सहयोगी पक्ष' करून घेतले होते.

घुबडांचा प्रतिनिधी बिचारा झोप कशीतरी टाळून वनसभेत सहभागी होई. तो कायम "हा एक
महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी" एवढे(च) बोलत असे. अगदी
चर्चेच्या समारोपाच्या भाषणातदेखील. आणि त्याला दिवसा दिसत नसल्याने तो कुठूनही
त्याचा संवाद म्हणत असे. एकदा तर वनसभापती झालेल्या सिंहाच्या आयाळीतच अडकून त्याने
तो संवाद म्हटला होता (तेव्हापासून सिंहप्रतिनिधी वनसभेला यायचे थांबले.
प्राणीशाहीच्या नावाखाली तोंडचा घास सोडून द्यावा लागतो हे त्यांना झेपले
नाही).

थोडक्यात, लालतोंड्या माकडांना कुणी विचारेना.

त्यांनी आपला प्रतिनिधीप्रमुख बदलून पाहिला. पहिला प्रमुख "हो, आहोच आम्ही
भांडवलशाही" असे ठासून सांगणारा होता. दुसरा कसा होता हे त्याला स्वतःलाच समजले
नाही. तिसरा कायम बावरलेला असे - वाघाच्या शिकारीला निघालेल्या हरणासारखा.

शेवटी त्यांचा आजवर कायम झाडांआडून हालचाली करणारा नेता पुढे झाला आणि त्याने
प्रतिनिधीप्रमुखपद स्वीकारले. तसे त्याने अस्वलाच्या वनमंडळात एक महत्त्वाचे पद
स्वीकारले होते, पण त्यानंतर काही कौटुंबिक अडचणींमुळे तो झाडांआड गेला तो
आतापर्यंत.

त्याने आधी आजवरच्या घडामोडींचा नीट अभ्यास करायला घेतला. कोल्ह्यांनी सोडचिठ्ठी
दिल्यापासून लालतोंड्या माकडांची घसरण सुरू झाली होती. त्यामुळे त्याने
कोल्ह्यांबरोबर पुन्हा आघाडी करता येते का याची चाचपणी केली. पण त्याचा खलिता घेऊन
गेलेल्या दूताची कोल्ह्यांनी शेपूट तर छाटलीच, शिवाय निरोपही पाठवला "यापुढील
प्रतिनिधींनी आपापली शेपूट छाटून घेण्याची व्यवस्था स्वतःच करावी आणि कोल्ह्यांचा
वेळ वाचवावा". विषय संपला.

मग त्याने बाकीच्या संभाव्य सहकारी प्राण्याची यादी करायला घेतली.

हत्तींची निष्ठा अशी कुणावर नव्हती. त्यांना त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटल्याशी
मतलब होता.

वाघ, बिबटे आणि सिंह यांना त्यांच्या राखून ठेवलेल्या जंगलात जोवर पुरेसे
तृणभक्षी प्राणी असतील तोवर सरकार कुणाचे आहे याचा काहीही फरक पडत नव्हता. आणि ते
तृणभक्षी प्राणी वाढवण्यात (वा कमी करण्यात) सरकारचा काहीच हात नव्हता. निसर्ग ते
काम पार पाडत होता.

अस्वले एव्हाना सरकारवर नाखूष झाली होती, कारण पहिल्या वनचरप्रधानाचे म्हणावे
तसे स्तोम सरकार माजवीत नव्हते. अगदी मोहाच्या वनामधून जाणार्‍या एका झर्‍याचे
नामकरणही अस्वला ऐवजी लांडग्यांच्या प्रतिनिधीच्या सासर्‍याच्या नावाने केले गेले
होते.

तरस परत पाय फरकाटत कुठेही जायला तयार होते.

पण मनगटात ताकद अशी म्हटली तर ती काळतोंड्या हुप्प्यांच्याकडे होती. त्यांची
दहशत सगळ्या तृणभक्षी प्राण्यांमध्ये होती, कारण कुणी विरोध केला तर त्याला उपाशी
मरावे लागे.

तिथेच खरी मेख आहे याची खात्री पटल्यावर लालतोंड्यांच्या नेत्याने
काळतोंड्यांच्या टोळीशी संधान साधायचे प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा काळतोंड्यांनी
अजिबात लक्ष दिले नाही. पण प्रयत्न फारच चिकाटीने सुरू झाल्यावर नाईलाजाने त्यांनी
लालतोंड्यांच्या नेत्याला भेटायला बोलावले.

लालतोंड्या संपूर्ण अभ्यास करून गेला होता. काळतोंड्यांमध्ये एकूण तीन नेते
होते. एक वयस्कर आणि दोन तरणे. त्या दोन तरण्यांच्या वादात त्या वयस्कर नेत्याचे
फावले होते. आणि त्या दोन तरण्या नेत्यांपैकी एकजण जरा 'ज्येष्ठांचा सन्मान राखला
पाहिजे'छाप संस्कारांतला होता.

लालतोंड्याने गेल्यागेल्या आधी वयस्क काळतोंड्याचे पाय धरले. त्यावेळी
त्याने स्वतःची शेपूटही अगदी सरळ दोरीसारखी मागे अंथरली होती. अशा रीतीने सर्वोच्च
मान देऊन झाल्यावर त्याने बरोबरच्या सेवक माकडांना जांभळांचे द्रोण पुढे आणायला
फर्मावले. वयस्क काळतोंड्याला वयानुसार रक्तशर्करेचा त्रास होऊ लागला होता. त्याला
जांभळे आणि विशेषतः जांभळांच्या बिया उत्तम असे लालतोंड्याने अधिकारवाणीने
सांगितले. वयस्क काळतोंड्याच्या कपाळावरल्या चारपाच आठ्या कमी झाल्या. एक पाऊल तरी
आत पडले.

मग लालतोंड्याने काळतोंड्यांच्या गटाला जंगलाच्या बाहेरच्या (शहराच्या) बाजूला
एकदा फेरफटका मारायला यायचे निमंत्रण दिले. मानवी वस्त्यांजवळ कायम असलेला
पांढर्‍या रंगाचा धूर कसा सुखद आणि तब्येतीला चांगला असतो याचे त्याने विवेचन केले.
श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांनी तर हे दर पौर्णिमा-अमावास्येला करावे म्हणजे फायदा
होतो हेही त्याने सांगितले. तरण्या काळतोंड्यांपैकी एकाला ('ज्येष्ठ सन्मान'छाप)
मधून अधून श्वास घ्यायला त्रास होई. त्याने हे मन लावून ऐकले आणि शेपटीचा आकडा
तीनदा ओवाळल्यासारखा फिरवला. दुसरे पाऊल पडले.

आता 'तो क्षण'.

"शेवटी आपल्या जातभाईंचे हित आपण नाही बघायचे तर मग कोण बघणार?" इथे तीनही
काळतोंड्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले. "काळतोंडी काय नि लालतोंडी काय, माकडे ही
एकाच जातीची. पार हनुमानाच्या काळापासून. त्याच्या काळात आपण एकत्र होतो, तर आपला
किती दबदबा होता. एवढे मोठे राक्षस नि माणसे, आपल्यापुढे पार दबून असायची".

आता तिघेही काळतोंडे गप्प झाले. वनकारणात पडायचे म्हटल्यावर अभ्यासात त्यांच्या
दांड्या उडाल्या तरी त्यांनी फिकीर केली नव्हती. लालतोंड्या मात्र खुद्द
दंडकारण्यात जाऊन शिकून आला होता. त्याने अजून गाडी हाणली.

"त्यातही थोरली जात म्हणजे काळतोंडे आणि धाकले म्हणजे आम्ही. पण या
थोरल्यांची सध्याचे सरकार काय इज्जत ठेवते आहे? पहिल्या वनसरकारात आम्ही सहभागी
होतो. तेव्हा तुम्हांलाही सहभागी करून घ्यावे असे आमचे आग्रही मत होते. पण तसे
करायला नको म्हणून तर आमच्याशी केलेली युती तोडली ना कोल्ह्यांनी. आणि तुम्हांला
दिले काय? तर 'वनचरसाम्राज्यसंरक्षक' ही पदवी. वनसंसदेच्या घटनेप्रमाणे तुमचे स्थान
सगळ्या प्राणीप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांच्याही खालचे. एकदम चतुर्थश्रेणी कामगार.
तुम्हांला ना विशेष सवलती, ना खास भत्ता. फक्त फळझाडे राखायची जबाबदारी दिल्यासारखे
दाखवतात ते, पण तुमच्याखेरीज फळझाडांवर अधिकार आहेच कुणाचा? तुमचाच असलेला अधिकार
तुम्हांला दिल्यासारखे करायचे, आणि पायरी काय, तर चतुर्थश्रेणी?"

जमीन भुसभुशीत होऊ लागली होती.

"आपण सगळे जातभाई एकत्र आलो ना, तर सरकार आपलेच. वाघ, बिबटे, सिंह, हत्ती,
अस्वले, सगळेजण तयार आहेत आपल्याला पाठिंबा द्यायला. फक्त तुम्ही पुढाकार घेतला आहे
एवढे त्यांना कळले पाहिजे. आणि प्रत्यक्ष सरकार चालवायची चिंता करू नका. ते काम
आम्ही लालतोंडे करू. पण सर्वात पहिला निर्णय हा घेऊ की 'वनचरसाम्राज्यसंरक्षक' हे
पद प्रथम श्रेणीतले, अगदी वनमंत्रीमंडळाच्या श्रेणीचे करू."

"शेवटी आपल्या जातभाईंचे हित आपण नाही बघायचे तर मग कोण बघणार?"

सरकार बदलले. आणि अशारीतीने जंगलातही एकदाची लोकशाही रुजली.

तात्पर्यः शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, पण जातीपुढे सगळे कनिष्ठ.