गल्लीत कोणाला केव्हाही दिसत असतो
सरपटत फिरत असतो ....
रात्री -अपरात्री कधी कधी भर दुपारी
कोणी त्याला नाग म्हणतो
कोणी साप !
कोणी जनावर..!!
परवाच कोणीतरी त्याला बघितला भरदुपारी
एक उंदीर गिळताना
पाचावर धारण बसली त्याच्या
भय केविलवाणी झाली अख्खी गल्ली
दिवसापण सावध पावले ढकलू लागली
आपापल्या पोरांना पोटाशी घेऊन
मनात भय कालवून बसली
परवा जमिनीपर्यंत वाकलेल्या नारळाच्या फांदीवरून बिनधास्त सरपटत
सळकन निघून गेला विजेच्या वेगाने
ज्याने बघितला तो
पांढरा फटक पडला
साक्षात मृत्यूचा साक्षाक्तर झाला त्याला
ह्याचे काहीतरी केलेच पाहिजे
एक मात्र झाले गल्लीतले उंदीर गायब झाले .....!
मग कोणीतरी हिमतीने सर्पमित्राला कळवले
त्याचे लपलेले ठिकाण दाखवले
अलगद सापडला त्यांच्या जाळ्यात
पिशवीत घालताना फुसांडत होता
फुक्तारत होता
आता एक झाले गल्लीत उंदीर पुन्हा बीळ करून माती काढू लागले आहेत
दिवसा ढवळ्या मवाल्यासारखे फिरू लागलेत
परवाच एक घूस मांजराच्या अंगावर धावून गेली
पाळलेले मांजर धूम पळून गेले ....
एक नाग गेला
नि आता उंदीर मोकाट सुटलेत ...!!!!