प्रेमात पडलो मी..

मी  बरं का दोस्तहो एकदा प्रेमातच पडलो
बघता बघता पार डोक्यापर्यंत बुडलो
नाका- तोंडात प्रेम गेलंय असं कळ्वळीने ओरडलो (२)
जग सारं हसत होतं, मी हळूच रडलो..

अरे रात्र रात्र जागवून आम्ही प्रेमाला शिव्या घातल्या होत्या
मित्रांच्या प्रेमगाथा सांगणाऱ्या घरात बऱ्याच रिकाम्या बाटल्या होत्या
पण काय करता राव शेवटी व्हायचं ते  झालंच (२)
नशीबच जळकं आमचं तेव्हा प्रेमात पडणं आलंच !

बरं प्रेमात पडल्यावर नेमकं काय करायचं असतं
हात-पाय मारून वर यायचं का ओघाने तरंगायचं नुसतं
हे कवी-बीवी सुद्धा फक्त जमेचीच बाजू सांगतात (२)
पोहऱ्यांचं ठीक आहे अहो, आमच्यासारखे नवशिखे प्रेमात पांगतात

प्रेमसागर वगैरे म्हणतात ते सगळं मिथ्य असतं
जो तरला तो हरला अन बुडला तो जिंकला हेच प्रेमात सत्य असतं
रोग म्हणतात कुणी  प्रेमाला, त्यात मात्र तथ्य असतं (२)
त्यावर प्रेम हेच औषध आणि प्रेमच पथ्य असतं ..

किती म्हणून मी  त्या आठवणींशी  झगडलो
पण आज बांध फुटला आणि मी ओक्साबोक्शी रडलो
अक्कल गहाण ठेवली आणि त्या आडवाटेवर तडमडलो
पाय नेमका घसरला आणि मी प्रेमातच पडलो ..