इंटरव्ह्यू

ऑफिसात दुपारी बॉसनी आपल्या केबिनमध्ये बोलावलं.

"मे आय कम इन सर! " मी म्हणालो.

"यस यस! " - बॉस. "हे पाहा, मि. देशपांडे! आत्ताच तुम्हाला स्वर्गात जायचे आहे. " "काय! " मला चक्कर आली. पण त्यांना माझ्या या प्रतिक्रियेचे भान असावे. ते म्हणाले, "अहो! तसं नव्हे, तुम्ही आमचे सर्वांत चांगले न्यूज रिपोर्टर आहात. तर आता तुम्हाला थेट स्वर्गातील देवांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. बरं त्यासाठी तुम्हाला मरायची गरज नाही. " मी अजूनही शॉक लागल्याच्या अवस्थेत होतो.

"आमचा तिथल्या ऑफिसशी संपर्क झाला आहे, आज रात्रीची अपॉइंटमेंट मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही तिथे गेल्याचं कोणालाही कळणार नाही. काम संपवून रात्रीच परत या. " इति बॉस.

बरं म्हटलं (त्याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता) रात्री स्वर्गाकडूनच मला नेण्याची सोय झाली होती. योग्य वेळी मी तिथे पोहोचलो.

प्रथम भेट आपल्या गणरायाची घ्यायची होती. तो मान तसाही त्यांना मिळालेला आहेच. त्यांना वंदन करून प्रश्न विचारू लागलो. "या वर्षी आपण बारा दिवसांसाठी आमच्याकडे येणार आहात, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? " मी म्हणालो. "त्यात काय वाटायचं, मी आल्यावर जे काही तुम्ही सगळे करता, ते मला आवडतं की नाही, ह्याचा विचार कोणीही करत नाही. प्रत्येक जण आपली सोय, आपली इच्छा याप्रमाणेच वागतो. त्या दहा-बारा दिवसात मला न आवडणाऱ्या, त्रास होणाऱ्या कितीतरी गोष्टी तुम्हा सर्वांकडून केल्या जातात. मला धांगडधिंगा नको, फक्त शुद्ध भक्ती हवी. तीच मिळविण्याच्या आशेने मी दरवर्षी तिथे येतो पण अजून तरी मला तशी प्रचिती आली नाही." बाप्पांनी आपले दुःख सांगितले. मला या सत्याची जाणीव असल्याने माझ्याजवळ बोलायला शब्द नव्हते. नंतर त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फॉर्मल प्रश्न विचारले. पण वेळ संपत आली होती, इतर देवी-देवतांचे इंटरव्ह्यू घेणे जमले नाही. त्यांची क्षमा मागत पृथ्वीकडे निघालो.

मध्येच स्वर्गाच्या गाडीत बिघाड झाला. ब्रेक फेल झाला असावा. मनात म्हटलं ऍक्सिडेंट झाल्यावर परत वरच जावे लागेल. असा विचार येत असतानाच जोराचा आवाज झाला. मी खाली जमिनीवर पडलो. काही सेकंदानी जोरा-जोराने कोणी ओरडल्याचा आवाज आला. डोळे उघडले तर समोर बॉस. "दिवसाढवळ्या ऑफिसात झोपा काढताना लाज नाही वाटत. आजपर्यंत एकही काम नीट केलं नाही. आता तुमच्याबद्दल विचार करावाच लागेल................ " खूप वेळ त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच राहिला.

एव्हाना आपल्याला कळले असेलच हे सर्व स्वप्न होतं ते.