ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता..!

''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता''
म्हणते सखी मला, अन् हळूच हसते ।
तळहातांवर चेहरा घेउन,
उत्सुकतेने समोर बसते ।

समजत नाही काय करावे,
जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे-
-समोरची वाचावी कविता?
वाचू देते खुशाल तीही,
केवळ माझ्या कवितेकरता ।

क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा,
मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा
पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते,
विसरलास का रे कविता ती?

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!

- चैतन्य