"हक्क कुणाचा?"
प्रेमपाऊस जर बरसतो, तयाच्या डोळ्यात,
मग का करावे तिने, जिणे कोरड्या उन्हात?
पाण्यासही असते, कधी तहान,
पण अंगावर ते, उन शालीन,
राधा तर भिजली, शामनीळ्यास पाहून,
पण उरात भिजते चिंता, की होईन बदनाम,
म्हणून भजावा का तिने, कृष्ण सोडून राम?
इथे तिच्या मुखी सतत, शब्द 'तू' बनून नाम,
फक्त शब्दावर कुणी, करते का रे प्रेम?
प्रेमातही करावा कधी त्याग, मोह सोडून,
त्यागासही द्यावा, तोच मान,
आणि जो करेल त्याग, तयास तोच संन्मान,
राहिले का रे तुजला, तिचे भान?
मीरेस जपले का रे तू, राधे समान?
एकीस मिळाले प्रेम, तर एकीस विषाचा प्याला,
दोहोंच्या प्रेमात अडकला इथे, हा बिच्चारा सावळा!
एक मोहात तर एक निर्मोहात,
दोघी चिंब भिजल्या तुझ्या पावसात,
इथे राधा तर तिथे मीरा तुझिया मनात..
भिजलेली बासरी, कशी वाजेल रे गोकुळात?
पाऊस तुझा, कसा वाटशील रे दोघात?
आहेत मनात, प्रश्नांची एकच अबोल रांग,
सांग कृष्णा आता, तुच सांग,
केवळ या यक्षप्रश्नाचे उत्तर तुच सांग,
एक अगदी स्पर्शास आस, पण जरा थांब,
आणि एक मनात पास, पण स्पर्शास लांब,
हक्क कुणाचा तुजवर? याचे उत्तर तुच सांग!
-- श्रीनिवास गुजर