तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!

काल तुम्ही लांबून तुमची गाडी दाखविली 
म्हातार्याला 
काय मस्त रंग होता हो तिचा 
गाडीच नाव काय तुम्ही घेतले 
डोक्यावरून गेले बघां त्याच्या  
त्याला  वाटले आपण पण फिरवावा जरासा हात 
तुमच्या नजरेत त्याच्या  हाताची किमंत दिसली 
नि हिमंत नाय झाली बघा म्हातार्याची 
तिला कुरवाळायला... मायच्यान ..!!
शेती    करणारां म्हातारा 
आयुष्यभर  तेच केले  
कसा लावणार तुमच्या गाडीला हात 
रस्त्यात तुम्हाला तुमचा मित्र भेटला 
तेव्हा तुम्हाला लई   लाज वाटली 
डोळ्यात दिसत व्हतं  पाक तुमच्या... 
 
 
हाताच्या पंजातून  तुम्ही ओठाचा चंबू करून एक फुकंर मारली 
तुमच्या छोटीला 
तिने बी तसेच केले 
म्हातार्याची  पोर म्हणाली, फ्लाईंग कीस हाये ह्यो 
म्हातार्याला  पचकन थुंकल्याबिगार 
नाही  मोकळे करता येत मन 
तुमच्या गादीवर तुम्ही झोपायला जाता 
रांगत एखाद्या लहान पोरावानी 
म्हातारा म्हणला आसे  काहून रे  
हसून म्हणाला गादीवरची चादर खराब होऊ नाही म्हणून 
तुमचे लहानपण तर गेलेना गादीवर हागून मुतून 
आतां हा टोपीवाला शानपणा 
म्हातारा  पचकन टाकतो पिचाकारून त्यांच्या नागड्या खिडकीतून 
आपल्या मनातला विचार ...
  
दोन दिवसातच जामटून  गेला 
तळहातावर ओठाचा चंबू करून एक फुंकर मारली 
नातीकडे बघून 
अन निघाला घराकडे  
हे कसले घर नि कसले दार  
इथे जागा नाही पीचकारायला 
घराकडे बघता बघता तो हलकेच हरवून गेला 
ह्या जगात आपण एकटेच आता 
नि हलकेच डोळा पुसला ...
नि पाय ढकलीत पुढे सरकू लागला 
दिशाहीनपणे ........!!