कळी अबोलीची

ओल्या श्रावणाचा रंग, पसरता भवताली 


मनातल्या स्वप्नांची त्या, कळी अबोलीची झाली           || धॄ ||   

तिला पाहता मनीचा, उजळतो शुक्रदीप,
जग विसरून मन, राहते तिच्या समीप,
स्पर्शाविना स्पंदनांची, जादू ही सुगंधलेली !                || १ ||

मना सोसवेना आता, एकटेपणाची सल,
काळ्याभोर डोळ्यांनी त्या, मला घातली गं भूल,
भान, अवधान माझे, घेऊनी कशी उडाली ?               || २ ||

तिच्याशीच बोलतो मी, माझ्याशी मी बोलताना,
अन तिने हळूवार, समजूत काढताना,
दोन पावलांची वाट, चार पावलांची झाली !                 || ३ ||

 - अनुबंध