३५. जागृती

झोप ही मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे. झोपेची आध्यात्मिक उकल हा अनेक रंगी अध्यात्माच्या एक अनोखा रंग आहे.

सत्य समजलेल्या व्यक्तीला ‘जागृत पुरुष’ म्हणतात कारण त्याला झोपेच्या या पैलूचा उलगडा झालेला असतो. झोप हा अध्यात्माचा एकदम काव्यात्मक पैलू आहे. आज झोपे विषयी लिहावंस वाटतंय.

अस्तित्वाची एकरूपता ही ऑरगॅनिक युनिटी आहे. मेकॅनिकल युनिटी आणि ऑरगॅनिक युनीटीमध्ये फरक आहे. कार ही मेकॅनिकल युनिटी आहे पण शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे. ऑरगॅनिक युनिटीत सगळे पार्टस् जरी मेकॅनिकल युनिटी सारखे एकमेकाशी निगडित असले तरी ते एकाच मूलद्रव्या पासून बनलेले असतात. मेकॅनिकल युनिटीत तशी अशी अट नाही. शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे कारण सगळं शरीर हे अन्न या एकाच मूलद्रव्याचं रूपांतरण आहे.

आता अस्तित्व ही ऑरगॅनिक युनिटी आहे म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. अस्तित्वातलं सगळं प्रकटीकरण जाणीव या एका मूलद्रव्याचं रूपांतरण आहे. जाणीवेलाच निराकार किंवा शून्य असंही म्हटलंय.

इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर पुढे मजा आहे. झोप ही जाणीव या अस्तित्वाच्या मूलतत्त्वाला रूपांतरित करणारी प्रक्रिया आहे. सगळ्या प्रकट जगाच्या निर्मितीच कारण झोप आहे!

अगदी सरळ सरळ सांगायचं झालं तर माणूस ही जाणीवेला आलेली जाग आहे आणि दगड ही जाणीवेच्या झोपेची अंतिम अवस्था आहे. देवाच्या मूर्ती दगडाच्या बनवण्याचं कारण टिकाऊपणा नसून प्रतिकात्मकता आहे. दगड हे निम्नतम रूप, माणूस ही मधली अवस्था आणि सिद्ध पुरुष ही जाणीवेची अंतिम अवस्था असा क्रम आहे. जागृत पुरुष हे जाणीवेचं अंतिम रूप आहे. संपूर्ण जागी झालेली जाणीव म्हणजे अनंत मोकळं आकाश, अथांग अनंतता आणि गाढ झोपलेली जाणीव म्हणजे दगड!

जाणीवेच्या रूपांतरणाची प्रक्रिया अत्यंत लोभस आहे. जाणीवेचं रूपांतरण म्हणजे शून्याचा आकार होणं, निराकाराचा आकार होणं! काही नाही त्यांनी रूप धरण करणं! अस्तित्वाला त्यामुळे रहस्य म्हटलंय आणि जादूचं माणसाला खोल कुठे तरी आकर्षण आहे. हे अस्तित्व जादूमय आहे!

या जादूगिरीला आणखी एक रम्य पैलू आहे, जाणीव या रूपांतरणात जशीच्या तशी राहते. जाणीव रूप धारण करते पण स्वतः निराकारच राहते. हे आरशा सारखं आहे, आरसा छबी धरण करतो पण स्वतः जसाच्या तसा राहतो. झेन संप्रदायात जाणीवेला आरशाची उपमा दिलीय.

रोजची झोप हे जाणीवेचं नेणीवेत रुपांतर आहे म्हणजे आपण कळण्याकडून न कळण्याकडे जातो. आपण बिछान्यावर आहोत, डोळे मिटलेत, सगळं ऐकू येतंय, जाणवतंय, विचारांची मालिका हळूहळू इल्लॉजिकल होते आणि मग एकदम काही कळेनासं होतं. या कळण्याच्या क्षमतेचं न कळण्यात रुपांतर झालं तरी जाणीव, म्हणजे थोडक्यात आपण, जसेच्या तसे राहतो कारण जाणीव कधीही स्वभाव बदलत नाही. त्यामुळे कितीही गाढ झोप लागली आणि काहीही कळेनासं झालं तरी झोप उघडल्यावर आपल्याला गाढ झोप लागली होती आणि काहीही कळत नव्हतं हे कळतंच!

जागृत पुरुषात आणि इतरे जनात फक्त इतकाच फरक असतो, या कळण्याकडून न कळण्याच्या प्रदेशात जाताना तो स्वतःला विसरत नाही, तो या रूपांतरणात जसाच्या तसा राहतो. सामान्य माणूस सांसारिक विवंचनांनी इतका दमलेला असतो की तो स्वतःला विसरून जातो आणि त्याला आपण आहोत ही आठवण जाग आल्यावर येते.

कधी तरी हा प्रयोग करून पाहा ‘मी आहे’ हे भान झोपताना कायम ठेवायचा प्रयत्न करा, स्वतःला विसरू नका, एक दिवस असा येईल की झोप तुम्हाला कळण्याच्या क्षेत्रातून न कळण्याच्या क्षेत्राकडे नेऊ शकणार नाही. तुम्ही सदैव कळण्याच्या क्षेत्रातच राहाल, शरीर झोपेल पण तुम्ही जागे असाल!

या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमीचा असा अर्थ आहे.

संजय

पूर्वप्रकाशन  दुवा क्र. १