गुण गुण

"हिरवा निसर्ग हा संगतीने जीवन सफर करा मस्तीने...
 मनसरगम छेडा रे ...
 जीवनाचे गीत गा रे
 गुण गुणा रे  ....."

असच काहीस माझं मन मला सांगत असत जेव्हा मी बसने ऑफिसला जाते रोज...असाच काहीसा पट्टा आहे जिथे सुरेख उधळणं केली आहे निसर्गाने रंगांची...

"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे... "
अशीच काहीशी कविता होती ना लहानपणी मराठी बालभारतीच्या पुस्तकात...हो अगदी तीच आठवते...

डोंगरांच्या रांगा... त्यावर ते हिरवे हिरवे गालिचेच नाही का ? आणि त्यावर ते सकाळी सकाळी पसरलेलं धुकं...सारखा लपंडाव चाललेला असतो धुक्याचा आणि मग मधूनच सोनेरी सूर्यकिरण डोकावतात. अहाहा काय सांगू काय वेड लागत मनाला ते निरागस सौंदर्य पाहून ....

मग मी अवचितच गुण गुणायला लागते ....तो एकांत मग एकांत उरत नाही माझया संगतीने निसर्ग गायला लागतो...
मला तो म्हणतो जीवन असेच रंगांचे सुरेख मिश्रण आहे....

मी अशीच मग निसर्गाशी आणि स्वतःशीच बोलते...कधीच संपू नये असा वाटणारा आमचा संवाद ...

मन कधी कधी हिरवा रंग ल्यायत....खूप उंच उंच उडत....मोठी मोठी स्वप्न बघत

कधी कधी ते पाऊस होत ..... बरसत राहत

धुक्याच्या संगतीने आठवणींचा खेळ सुरू होतो

कितीतरी रंगांच्या आठवणी एकच गर्दी करतात मनात...कधी कधी मी खुदकन हसते...कधी लाजते...कधी मनाला काहूर लावतात आठवणी...कधी कधी दूर राहिलेल्या जवळच्यांच्या आठवणीने मन व्याकुळ होऊन जाते...

मग कुठेतरी एक तलाव भेटतो...म्हणतो तो मला बघ माज़्या अवतींभोवती कसे हे वृषवल्ली गुण्यागोविंदाने नांदतात...तू पण
हो ना माज़्यासारखी

असेच मग नांदा तुम्हीपण सौख्यभरे....

त्या तलावाच्या बाजूने असा एक टुमदार पूल आहे .....दुसर्‍या बाजूने आकर्षक वळण घेतलेला एक रस्ता आहे

भरधाव वेगाने माझी बस धावत असते मला म्हणते अस धावलं की कधी कधी मोठ्या वाटणार्‍या बर्‍याच गोष्टी मुंगीएवढ्या होतात
हे सगळेच माझे पक्के दोस्त झाले आहेत आताशा ......माज्या ह्या एकांताने मला बरेच सच्चे मित्र मिळवून दिले आहेत
ते सगळेच माज्यासंगतीने  गातात...हसतात....मला शिकवतात हे जीवन सुंदर आहे...तुमच्या पद्धतीने तुमचे गाणे गा...
हसा आणि हे जीवन अजून  सुंदर बनवा......
हा विचार मनात येतो आणि माझा प्रवास संपतो.. चालकाला धन्यवाद देऊन मे गुणगुणतच ऑफिसात जाते
"आनंदाचे झाड माज़्या अंगणात आहे ....आनंदाचे झाड  माझे आनंदाचे झाड...."
अशीच माझी गुण गुण दिवसभर सुरू असते