डोके सुन्न ....!
बधीर ….!!
सर्दीने हैरान ....!!!
काहीच ऐकू येत नाही
झाडाची पाने हलत असतात
कावळे कावकाव करीत झाडावर बसलेली
मला त्यांच्यां चोची फाकलेल्या दिसतात
पण आवाज येत नाही ऐकायला
मी सुन्न बधीर
केविलवाणा
माझे मन, कान,
आजूबाजूचे सगळे आवाज
म्यूट करून ठेवलेत
कोणीतरी ...!
बायको काहीतरी बोलतेय
डोंगराच्या पल्याडचा आवाज वाटतोय तिचा
अगदी निवांत मस्त
आणि एकदम छान वाटायला लागते
ध्यान लावून बसलेय कान
मन ,हे शरीर
हे ब्रम्हांड ..!!
निवांत शांतपन
काहीसे बधीर सुन्न सुंदर
आपलेपण
हवेहवेसे .....!!
शप्पत..!!
मस्त वाटतेय हे निवांतपण
सेंट्रलाईज ए सी. च्यां काच खिडकीतून
खालचा वाहणारा रस्ता
गाड्यांचा बंद गोंगाट
पाखरांची पंख हलवीत निशब्द सरसर
खालच्या लोकांची मूक हालचाल
हे सगळे छान वाटतेय
सुन्न बधीर आपलेपण ...!!
ऐकायला यायचे नाही आईला
म्हणून वैतागून जायची ढीगभर
तिला ऐकायची असते आमच्या नवरा बायकोची कुजबुज
आमचे बहाणे
एकेक डाव
रुसवे फुगवे
मग ती करावयाची ध चा मा
नि आता मी सुन्न बधीर
मस्त ध्यानस्त
आवाजाच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवून
दाबून ठेवलाय
आवाज बंद आतमध्ये
नाही ऐकू येत काहीपण
मी माझ्यात बंद
काचेच्या पेटीत निवांत
मस्त बहिरा
आपल्यातच गर्क ....!!