आध्यात्मावर इ-पुस्तक

मी मराठी. नेट नि माझ्या सर्व आध्यात्मिक लेखनाचं संकलन इ-पुस्तक स्वरूपात प्रकाशित केलंय

दुवा क्र. १

आध्यात्मिक दृष्टी म्हणजे मुक्तपणे आणि आनंदात जीवन जागण्याची आपली प्रत्येकाची इच्छा, अशा इच्छेला दिशा मिळावी या प्रयत्नातून झालेल्या लेखनाच्या प्रकाशनाच्या निमित्तानी लिहिलेला हा लेख : 

ओशोंनी असं म्हटलंय की एखादा सत्य समजलेला माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याच्या बरोबर तो त्याचा सारा बोध देखील घेऊन जातो, त्यामुळे मला सुद्धा जे समजलंय ते सर्वांना उपलब्ध व्हावं अशी इच्छा होती. पुस्तक हा त्यावर एक पूर्व प्रचलित उपाय होता पण प्रकाशक शोधा, मग जाहिरात, उरलेल्या प्रतींची साठवण आणि पुन्हा कागदाचा अपव्यय यामुळे मला ते मनोमन पटत नव्हतं.

सुरुवातीला मला इंग्रजीत लिहावंस वाटत होतं कारण मराठीत सहज लिहिता येईल अशी सोय नव्हती पण योगायोगानं मला मनोगतचं संकेतस्थळ सापडलं आणि मनोगतवर लिहिणं हा पर्याय मला सर्वात सोपा वाटला. मी एका क्षणात, कमीतकमी प्रयासात, पर्यावरणाला कमीतकमी धक्का लावत अनेक स्तरातल्या अनेक संपन्न लोकांपर्यंत पोहोचू शकत होतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील समजणार होत्या.

हे लेख दोन वर्षाहूनही जास्त काळ सात्यतानी मनोगतवर लिहिले गेलेत त्यामुळे त्यावर आलेले तिनशेहून अधिक प्रतिसाद आणि त्यावर माझी उत्तरं यांचे आणखी पाच-सहा लेख होतील.

मला मीमच्या सभासदांना असं सांगायचंय की हे पुस्तक म्हणजे नेहमी समजली जाते तशी रुक्ष अध्यात्मिक चर्चा किंवा विविध मतांचं खंडन, किंवा माझी मतं इतरांवर लादणं आणि रिकाम्या हातानी परत असा मामला नाहीये. हा जगण्याच्या अनेक पैलूंचा विविध अंगानी घेतलेला वेध आहे. त्यात मृत्यू, नाती, प्रेम, पैसा, शरीर, संगीत, काम, मन, साक्षात्कार, स्वधर्म, देव, श्रद्धा, स्मृती, गेस्टाल्ट, भोग, सर्वज्ञता अशा अनेक विषयांवर लेखन झालंय.

जगातली कोणतीही चांगली आणि अप्रतिम गोष्ट सहज आणि सोपी आहे असं माझं फायनल कंक्लूजन आहे. मी कॉलेज मध्ये शिकवत होतो तेव्हा विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट सांगायचो की जो प्रोफेसर तुम्हाला त्याचा विषय अवघड आहे असं सांगतो त्याला तो विषय समजला नाहीये असं समजा. सत्य ही या अस्तित्वातली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात रम्य गोष्ट आहे त्यामुळे हे पुस्तक म्हणजे एक ओपन फोरम आहे आणि तुम्ही तो इंप्रोवाइज करावा अशी इच्छा आहे.

या पुस्तकाच्या बाबतीत जर कुणाला असं वाटत असेल की संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर आपण सत्यावर चर्चा करू तर ते तसं नाहीये. माझ्या संपूर्ण आध्यात्मिक आकलनाचं सार असं आहे की सत्य तुम्ही आता या क्षणी काहीही न करता आहात. तुम्हाला सत्य मिळवायचं नाही वापरायचंय. सगळ्यांचा जो एक मोठा आध्यात्मिक गैरसमज आहे की अमका म्हणजे असामान्य तमका म्हणजे अलौकिक, असा चमत्कार झाला की झालोच आपण सिद्ध, या जन्मी हे काम नाही, अमका सरळ आकाशात गेला, तमका पाण्यावरनं चालत गेला वगैरे सगळं खोटं आहे.

मी ज्यावेळी ओशो कम्युनला जायचो त्यावेळी एकदा आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. एक संन्यासी म्हणाला 'अब ओशो नही तो सारा आश्रम सूनासूना लगता है! त्यावेळी मी त्याला (भर आश्रमात) म्हटलं ' अगर ओशो सत्य लेके जाते तो फिर सत्य की किमत ही क्या रह गयी? सत्य अभी है और हर वक्त हरेक को उपलब्ध है'.

मला तुम्हाला तेच सांगायचंय तुम्ही आज, आता, हा क्षण कसा रंगवताय यावर सगळं आहे. सत्य समजल्यावर तुम्ही या आयुष्यात रंगून जाल, एक मौज म्हणून तुम्ही अध्यात्माकडे बघा, ती एकदम सोपी गोष्ट आहे.
सत्य ही कुणी व्यक्ती नाही तो एक मूड आहे आणि हा तुमचा किंवा माझा नाही साऱ्या अस्तित्वाचा आणि कायमचा मूड आहे. आपल्याला फक्त त्या मूडशी ट्यून-अप व्हायचंय. एकदा तुम्ही हे मनोमन मानलं की मग जिथे जाल तिथे मजा आहे.
एकदा आपण सर्वांनी हे जाणलं की मग हे जग आनंदी व्हायला वेळ लागणार नाही.