३७. वेळ

वेळ ही अस्तित्वातली सर्वात भासमान तरी ही सर्वात खरी वाटणारी गोष्ट आहे.

वेळ हा निव्वळ भास आहे. सूर्य सतत प्रकाशमान आहे, पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण आपण तो बोध आचरणात आणत नाही. या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय, ही अत्यंत उघड आणि समजायला सोपी गोष्ट आहे.

वेळ हा भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे वेळेचं मनावर सतत दडपण आहे.

एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो.

वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात. मग प्रत्येक वेळ पाळण्याच्या वेळी आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो. वेळ ही कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा  मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात.

वेळ ही कल्पना आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: तुम्ही शरीरापासून वेगळे होता!

शरीर ही वेळेत झालेली निर्मिती आहे त्यामुळे शरीर आहे पण आपण 'शरीर झालेलो' नाही. आपल्याला शरीराची जाणीव आहे असं म्हणणं योग्य होईल. आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की वय शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एक सारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि आता हा उत्तररंग कळतोय पण आपण जसेच्या तसे आहोत!

शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, वर्जिनिटी या ख्रिश्चन उद्घोषाचा खरा अर्थ असा आहे.

वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो,   साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ असा आहे.

वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग  अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशा वरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगभ व्हायला लागते.

वेळ हा भास आहे हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना ते पटवून देण्याचा लगेच प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे.

जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है!

जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसऱ्याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की ‘अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ’ आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!

संजय

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १