अंबाडीची भाजी

  • अंबाडीची कोवळी भाजी (१ जुडी)
  • डाळीचे पीठ-३ चमचे
  • शिजवलेला भात - १चमचा
  • तुरीचे वरण घट्ट - (मूगडाळ मिक्स असली तरी चालेल)- २ चमचे
  • तेल, मीठ, मोहोरी, लसूण- ६-७ पाकळ्या, मिरची व लाल तिखट
  • गूळ- २ चमचे
४५ मिनिटे
३-४ जण

प्रथम अंबाडी नीट खुडून घ्यावी व स्वच्छ धुवून घ्यावी. एका पातेलीत वाटीभर पाणी घालून त्यात भाजी टाकून शिजावयास ठेवावी.

कुकर मध्ये नेहमीचा वरण भात झाला असेलच तर भात व वरण एका वाटीत घेऊन एकत्र घोटून घ्यावे. भाजी चांगली शिजली की आंचेवरून उतरावी व फोडणीसाठी कढई ठेवावी. जरा जास्त तेलात मोहरी- मिरची-लसणाची खमंग फोडणी करून त्यात ही भाजी घोटून घालावी. तिखट-मीठ चवी प्रमाणे घालून बेसन घालून ढवळावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर वरण भाताचे मिश्रण ओतावे व परत नीट ढवळून हादका द्यावा. शेवटी गूळ मिक्स करून उकळी काढावी व गॅस बंद करावा.

वाढतेवेळी दुसऱ्या एका कढल्यात लसणीची फोडणी तयार करून भाजीवर द्यावी. गरम- चुर्र असा आवाज झाला पाहीजे!

ज्वारीची गरम भाकरी, भाजी व कांदापात, मुळा, गाजर, भाजलेली हिरवी मिरची, असे सॅलड वाढावे.

ही भाजी एकदम कोरडी नसते... पळीवाढी करावी.

आत्या