मी मोडल्या घराचे वासे विकून आले;
माझ्या तुझ्या सुरांचे गाणे विकून आले.
का शाप भोगले मी वेड्या तुझ्या सुडाचे;
प्रश्नास छेडता या काही कळू न आले.
गावात आज माझ्या गर्दी भयाण झाली;
तू मांडला तमाशा बघण्या वळून आले.
नात्यास भेग पडली तुकडे हजार झाले;
कोलाज रेखण्या मी गोळा करून आले.
या झोपड्यास माझ्या छळते गिधाड जेव्हा;
आकाश झाकणारे घरटे विणून आले.
गाडून आपले नाते सात पावलांचे;
मम पाखरास जपण्या आई बनून आले.