हिमकण्या
ढगांचं कातळ फोडून, ठीपकणाऱ्या चांदण्या
अंगणात आल्या माझ्या, हितगुज सांगण्या
एक अलगद उतरली माझ्या पापणीच्या केसावर
ती झाली पाणी पाणी, रोमांच माझ्या अंगावर
कुणी आल्या भटकत, भिरभिरत वाऱ्यावर
कुणी शेवटी विसावल्या, झाडांवर, पानांवर
पसरली रजई पांढरी, घरांवर, गवतावर
सृष्टी झाली रुपेरी, नीलिमा सर्वांवर
पौर्णिमेची रात आहे, पण लुप्त चंद्रचांदण्या
म्हणून पेरलं हे चांदणं, बोलल्या हिमकण्या