एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा

जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू.. ) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार? आकिमआजोबा म्हणाले, " मी टाइप करेन साध्या कागदावर आणि फोटोकॉपी काढू त्याच्या. पण ते हिला पटत नाही, तिला डेकोरेटिव्ह आमंत्रण पत्रिका हव्या आहेत. त्यावर विचार चालू आहे आमचा. " ते दोघं काय बोलत आहेत, ते आधी समजेचना.. मग लक्षात आले की सप्टेंबरमध्ये तिचा ८०-वा वाढदिवस आहे आणि हे दोघंही त्या पार्टीच्या तयारी बद्दल बोलत आहेत. आजीच्या पंच्याहत्तरीला आमंत्रणपत्रं आणि टेबलकार्डांचे सगळे काम हान्सीयुर्गानने केले होते आणि आता तोच ३ आठवडे नाही तर कोण करणार? असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. "अजून २ महिन्यांच्या वर वेळ आहे सप्टेंबराला, घाई काय आहे तुला? "असे विचारल्यावर "लोकांना पत्रं पाठवून त्यांचा होकार-नकार घ्यायचा तर मध्ये महिना दिडमहिना हवा की नको? " असा उलट प्रश्न तिने उत्तरादाखल केला. तिला जास्त त्रास न देता "हॅत तिच्या, एवढेच ना? मी करतो की ते तयार, तुम्ही मजकूराचे बघा फक्त.. " दिनेशने असे म्हटल्यावर ती जरा खुश झाली. दोन दिवसांनी दिनेशने काही डिझाइन्स सिलेक्ट केली आणि त्यांना दाखवली. दोघे ती बघून आता मात्र एकदम खूष झाली. पण हे कागदावर कसे दिसेल? हे अजून त्यांना अपिल झाले नव्हते. तरीही त्यांना त्यातील एक डिझाइन निवडायला लावले. दुसऱ्या दिवशी दिनेशने एका ए-४ साइझवर त्याचा नमुना छापून आणला आणि त्यांना दाखवला, आता मात्र संगणकाची जादू त्यांना पटली. आकिम आजोबा आता मजकूराच्या मागे लागले.

दुसऱ्याच दिवशी आजोबांचा निरोप, " येऊन जा, मी मजकूर तयार केला आहे. " मी तिकडे गेले तर आजीला आजोबांचे अक्षर मला वाचताना लागेल की नाही? ही काळजी.. मी तिला मोठ्याने वाचून दाखवले तेव्हा शांत झाली. एक दोन फेरफार करून आम्ही मजकूर नक्की केला. संध्याकाळी दिनेश घरी आल्यावर पुन्हा एकदा आम्हा चौघांची सभा भरली. फायनल झालेला मजकूर त्या कार्डाच्या चौकटीत बसवला आणि त्यांच्याकडून ओके करून घेतला आणि त्याचा एक रफ प्रिंटआउट काढून त्यांना दिला. त्यात दुरुस्त्या करून झाल्या आणि एक फायनल ड्राफ्ट पक्का केला. आता कोणता कागद वापरायचा? त्याच्याबरोबर जाणारे रंगीत लिफाफे निवडायचे इ. वर गाडी आली. लगीनघाई चाललेली होती नुसती दोघांची.. पोस्टाने पाठवायचे लिफाफे पांढऱ्या किवा खाकी रंगाशिवाय दुसऱ्या कोणत्याही रंगात चालणार नसल्याचा नवा नियम समजला. त्यामुळे आता लिफाफ्यांना नटवता येणार नव्हते किवा रंगीत लिफाफेही वापरता येणार नव्हते. एवढ्यात थॉमसला म्हणजे हेडीच्या जावयाला तातडीने फ्रांकफुर्टच्या हॉस्पीटलात आणायचे ठरले. थॉमस म्हणजे रिटाचा नवरा, हेडीआजीचा जावई! आतड्यांच्या विकाराने तो आजारी असून म्युनशनच्या हॉस्पिटलात होता. काहीही खाल्ले तरी त्याला पोटात खूप दुखत असे, इतके की तो गडाबडा लोळायचाच बाकी रहायचा.. फ्रांकफुर्टमध्ये त्या विकारावरचा तज्ज्ञ असल्याने त्याला फ्रांकफुर्टच्या हॉस्पिटलात हलवण्याचा निर्णय तेथल्या डॉक्टरांनी घेतला. झाले, आता आजीला दुहेरी टेन्शन आले. थॉमसच्या आजाराचे आणि वाढदिवसाच्या तयारीचे.. आमंत्रणपत्रांकरताचा कागद निवडायला जायला तिला काही मूड नव्हता आणि वेळही.. आम्हीच मग ती जबाबदारी आपणहून घेतली. दरम्यान रिटा आणि थॉमस आले. थॉमसला तर थेट हॉस्पिटलातच नेले होते. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि ऑपरेशनचा निर्णय घेतला. आजीचा जीव थाऱ्यावर नव्हता. हॉस्पीटलच्या वाऱ्या आणि तयारी करताना ती शरीराने आणि मनानेही थकली.. आजोबा मात्र शांत होते, सगळे काही व्यवस्थित होईल असा त्यांना विश्वास वाटत होता. तसेच झाले, थॉमसचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले, तरी अजून काही दिवस हॉस्पिटलात राहणे भाग होतेच. तरी आता टेन्शन नव्हते.

आजी आता जोमाने तयारीला लागली. सगळ्यांना आमंत्रणपत्रे गेली आणि १५ दिवसात कोण कोण नक्की येणार त्याची यादी तयार झाली. आता हवीत टिशकार्टे म्हणजे प्लेसकार्डस.. येथे जेव्हा पंगत सदृश्य पार्टी असते तेव्हा कोणी, कोठे बसायचे हे यजमान ठरवतात आणि त्या व्यक्तिचे नाव त्या जागेवर लावून ठेवतात, येणारे पाहुणे आपापल्या नावाच्या खुर्चीवर बसतात. नेहमीसारखे नुसते नाव कार्डावर न लिहिता एकेका दिव्यावर नाव लिहायची कल्पना दिनेशला सुचली. आजीआजोबांना तसा एक दिवा तयार करून दाखवला, दोघे एकदम खूष झाली. आजी म्हणाली, लोकांना हे खूप आवडेल आणि आठवण म्हणून ते आपापल्या नावाचा दिवा घेऊन जातील.. मग आम्ही ते नावांचे दिवे तयार करण्याच्या उद्योगाला लागलो, आता बरीचशी तयारी झाली होती. चार दिवस आधी ८२ वर्षांची हेडीआजी तयारीला म्हणून आली. दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळे जेथे पार्टी होणार आहे त्या हॉटेलात जाऊन सगळी तयारी ठीकठाक आहे ना? ते पाहून आणि भारतात हा सोहळा कसा साजरा करतात याचे वर्णन ऐकवत तेथे जेवून तेथल्या जेवणाची चव पाहून आलो.

पार्टीच्या दिवशी सकाळी ९ च्या सुमाराला त्सेंटा आणि हेडी ब्यूटीपार्लरमध्ये जाणार होत्या. तिला सरप्राइझ द्यायचे म्हणून मी ब्लॅक फॉरेस्ट केक केला होता, त्या दोघी पार्लरमध्ये गेल्याचे पाहून आम्ही तो केक आकिम आजोबांना दाखवला. आजोबाही चकित आणि खूष झाले. केक फ्रिजमध्ये ठेवून टेबलवर छानसे डेकोरेशन केले आणि आजी पार्लरमधून आली की हाक मारायला सांगून आम्हीही पार्टीसाठी तयारी करायला घेतली. तासाभराने दोघी आज्या पार्लरमधून सुंदर होऊन आल्यावर केक बघितल्यावर त्याही खूप खूष झाल्या. दुपारी छोटीशी काफे कुकनची पार्टी करून मग आम्ही सगळे माइंझच्या गोंझनहाइमरहोफवर पोहोचलो. हॉलवर तयारी छान झालेली दिसत होती, आता आमचे रुखवत लावायचे बाकी होते. नावांचे दिवे ठरवलेल्या जागांवर ठेवून झाले. मंद संगीत सुरू केले. एव्हाना पाच वाजले होते. झेक्टच्या बाटल्या थंडगार आहेत ना ते पाहत होते तोच उटं आणि कार्लहाइन्स आलेच, मग पुढच्या १०-१५ मिनिटातच बोलावलेली सर्व मंडळी हजर होती.

आजोबांनी मग बोलावलेल्या सर्वांचे स्वागत केले, झेक्टच्या पेल्यांचा किणकिणाट झाला आणि आजीला सर्वांनी अभिष्टचिंतन केले. पत्रिकेत 'अहेर आणू नये.. ' असे लिहिले असले तरी आजीच्या आवडीची प्रालिनन्स आणि आपापल्या बागेतल्या फुलांचे सुंदर बुके बऱ्याच जणांनी आणले होतेच. सर्वाचे स्वागत झेक्टने झाल्यावर आपापले नाव पाहून सारे आसनस्थ झाले. तीन कोर्सचे जेवण होते. पिण्यासाठी कोणाला काय हवे त्याची विचारणा झाली आणि पहिला कोर्स सूप व सलाड आले.   ते येईपर्यंत हासआजीने त्सेंटाआजीवर केलेली कविता वाचून दाखवली. सूप सलाडचा समाचार घेतल्यावर ख्रिस्टीन उठली आणि तिने आजीवर केलेली कविता म्हटली. तिची सुंदर कविता ऐकत असतानाच मेन कोर्स म्हणजे चिकन + न्यूडल्स आले. आग्रह करकरून होफमधील लोकं वाढत होते. एकीकडे गप्पा चालू होत्याच. आम्ही दोघं इव्हेंट फोटोग्राफर असल्याने शूटिंग आणि फोटो चालू होते. जेवण झाल्यावर मार्लिसकाकूने आजीला काहीतरी कारण काढून हॉलबाहेर नेले. इकडे बिर्गिटने सगळ्यांना एकेक मेणबत्ती आणि दोघादोघांच्या जोडीला एक नंबर दिला. एका कागदावर तिने ८० डेकोरेट करून काढले होते. एकेक नंबरासाठी तिने काही काव्यपंक्ती रचल्या होत्या. असे १५ नंबर तिने रचले होते, आम्ही ३० जणं होतो. तिने नंबर बोलावला की दोघांनी आपली मेणबत्ती लावून ८० वाल्या कागदावर ठेवायची असा तिचा प्लान होता. हॉलमधले दिवे डिम केले आणि मार्लिसकाकूला सिग्नल मिळाला. ती आजीला घेऊन आत आली. बिर्गिट एकेक नंबर घेत गेली आणि आम्ही दिवे घेऊन लावत गेलो. आजी प्रत्येकाची गळाभेट घेत होती. जेव्हा सगळे दिवे तेवू लागले, तेव्हा समाधानाने तृप्त आजी आणि तिच्याकडे कौतुकाने पाहणारे आकिम आजोबा आणि हेडीआजी बघताना सगळेच हळवे झाले. आता प्लमबॉल्स विथ वॅनिलाआइसक्रिम आले. त्याचा आस्वाद घेत सगळे आहारले. आजीने आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानत सहस्त्रचंद्रदर्शनाचा उल्लेख करून सर्वांना चकित केले.

पार्टी आता संपत आली होती. एकेकजण आता निरोप घेऊ लागला होता. आजीचा होरा खरा निघाला. जाताना प्रत्येकजण आपल्या टिशकार्टाला आठवण म्हणून घेऊन गेला. सगळे गेल्यावर फुलं आणि चॉकलेटं, प्रालिननचे खोके पिशव्यात भरून, आवराआवरी करून गाडी हॉटेलातच ठेवून आम्ही टॅक्सी बोलावली. घरी आल्यावर उझोच्या साक्षीने परत एकदा सेलेब्रेशनची उजळणी झाली. तृप्त आणि समाधानी आजीआजोबांना गुडनाइट करून आम्हीही निरोप घेतला.