अक्षता

तू तशी सजशील जेव्हा, मी तुला पाहीन दुरुनी
साजरी प्रतिमा तुझी, घेईन मी डोळ्यांत भरुनी. 

आपुले क्षण सोबतीचे, सांग का ते भास होते?
कोवळे अनुबंध होते, की कशाचे फांस होते?
गंध ते हळवेपणाचे, बोलल्या शब्दास होते.
गुतंलो जणू एवढे की, वेगळे ना श्वास होते.
का सये उजवून सारे, तू अशी गेलीस फिरुनी?

शोधतो हरवून काळोखात आता बंद दारे
अंतरा उकलून गेले अस्तणारे चंद्रतारे 
सागरी मिसळून पाणी साचते डोळ्यांत सारे
सांगती मज हुंदके तालात ह्या, तू गीत गारे
मानसी वसतेस का, का जात तू नाहीस विरुनी?

काढली समजूत मी नादावल्या वेड्या मनाची,
सांगना चुकली कधी का वाट कोणा प्राक्तनाची?
झाहली विरहात पूरी ही कहाणी मोचनाची
माझिया नजरेत आता, तू अबोली त्या बनाची,
एकदा तुजला बघाया, अक्षता आणीन घरुनी !

- अनुबंध