३८. (एक) ग्रह, तारे आणि आपण !

कार्यकारण भाव' हा मानवी जीवनात युगानुयुगे अत्यंत कुतूहलाचा विषय आहे. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही विषयांचा तो केंद्र बिंदू आहे.

'काय केलं असता काय होईल' किंवा 'एखाद्या घटने मागे नेमकं काय कारण असेल' किंवा 'घटना अशी घडवायची असेल तर काय करावं लागेल' ही सगळी परिमाणं कार्यकारण भावात येतात.

प्रथम वैज्ञानिक दृष्टिकोन पाहू. विज्ञानाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घटनेला कारण आहे, ते ज्ञात असेल किंवा अज्ञात पण प्रत्येक घटने मागे कारण आहेच! जर ज्ञात असेल तर कारणीभूत असलेले घटक जुळवून मग शास्त्रज्ञ ती घटना पुन्हा पुन्हा घडवू शकतील आणि अज्ञात असेल तर विज्ञान ते शोधेल! फरक जो काही आहे तो फक्त वेळेचा आहे. विज्ञान म्हणतं घटना घडली की कार्यकारण आहे आणि कार्यकारण म्हटले की विज्ञान शोधाला तयार आहे! विज्ञानाला चमत्कार मंजूर नाही. एकतर ज्ञान किंवा अज्ञान आणि अज्ञानाला कायम आव्हान हे विज्ञानाचं सूत्र आहे.

समजा एखादा योगी म्हणाला की मी पाण्यावर चालतो तर विज्ञान म्हणतं, चालून दाखवा! कारण एक जण जर चालला तर त्याचं पूर्ण विश्लेषण करून आणि मग हवे ते सर्व घटक जुळवून दुसरा देखील पाण्यावर चालू शकलाच पाहिजे! एखादा सदेह आकाशात गेला तर दुसरा देखील जाऊ शकलाच पाहिजे हा विज्ञानाचा दावा आहे.

तथाकथित धर्म आणि विज्ञान यांचा इथेच बखेडा आहे. विज्ञान म्हणतं तुम्ही चमत्कार करून दाखवा आम्ही तो उलगडून दाखवतो! मग धार्मिक त्याचा भावनिक प्रश्न करतात आणि विज्ञानाला सरळ सामोरे जात नाहीत. ते नवरा बायकोच्या भांडणा सारखं आहे, आपलं म्हणणं सिद्ध करता येत नाही तर मग सरळ रडायला लागायचं आणि विषय भावनिक करायचा की मग प्रश्नच मिटला!

धर्म आणि विज्ञान यांच्या वादात सगळी दारोमदार फक्त एका गोष्टीवर आहे, 'देव' हे जे धर्माचं अधिष्ठान आहे तेच मुळी चमत्कारावर अवलंबून आहे! जर प्रत्येक घटनेचा उलगडा झाला तर चमत्कार संपतील आणि मग देव या कल्पनेला अर्थच राहणार नाही हे धार्मिक लोकांना माहिती आहे म्हणून ते विज्ञानाशी फटकून आहेत आणि भावनेचा इश्यू करून ते विज्ञानाला दूर ठेवतात.

विज्ञानाची गोची अशी आहे की कितीही उलगडा केला तरी बराचसा उलगडा अजून ही होत नाही. स्वतः आईन्स्टाईन नि म्हटलंय : I would rather become a plumber than a scientist in my next life because the more I explore the life, it is becoming more mysterious!

विज्ञानानी असंख्य शोध लावून मानवी जीवन अत्यंत सुखाचं केलंय हे निश्चित पण सर्वांगीण कार्यकारण त्यांना ही अजून गवसलेला नाही.

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमा विषयी एक जोक आहे. एकदा हा नियम वर्गात शिकवून झाल्यावर मॅडम विचारतात : 'कुणाला काही शंका?

मागच्या बेंच वरचा एक मुलगा विचारतो 'मॅम, हा शोध लागण्या पूर्वी सफरचंद काय खालनं वर जायची का?

आता या अँगलनी विचार केला तर विज्ञान फक्त आहे त्याचा उलगडा करू शकतं! देअर इज नथिंग लाईक ऍन इन्व्हेनशन एव्हरिथींग इज ओन्ली अ डिस्कव्हरी!

आणि त्याहूनही मोठा जोक पुढे आहे जो विज्ञान सोडवू शकत नाही 'मुळात सफरचंद वर गेलंच कसं? आता इथून मिस्टरी सुरू होते!

अध्यात्मानं कार्यकारणाचा वेध वैश्विक स्तरावर घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याला ज्योतिष म्हणतात! ज्योतिष शास्त्र नक्की काय आहे ते पुढील लेखात.

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १

संजय
दुवा क्र. २