खून की आत्महत्या ?

ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे.२३ मार्च १९९४ या दिवशी डॉ.मिल्स या वैद्यकीय परीक्षकासमोर आलेला मृतदेह रोनाल्ड ओपसचा होता.तपासणीअंती परीक्षकाने शॉटगनमधील गोळी डोक्यात शिरून त्याचा मृत्यू झाला आहे असा निष्कर्ष काढला.

प्रत्यक्षात इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा रोनाल्डचा उद्देश होता आणि त्याने तसे एका पत्रात  नमूद करून ठवले होते.पण उडी मारून तो नवव्या मजल्यापर्यंत आल्यावर त्याठिकाणी असलेल्या खिडकीतून बाहेर पडलेली शॉटगन मधील गोळी त्याच्या डोक्यात शिरून त्याक्षणीच त्याला मृत्यू आला होता.

खरे पहाता त्याला आत्महत्या करायची होतीच त्यामुळे मधल्यामधे त्याला मृत्यू आला म्हणून काही बिघडले नव्हते पण एक मजेची गोष्ट म्हणजे त्याला गोळी लागली नसती तर तो मरण पावला नसता कारण त्या इमारतीतील कोणालाच माहीत नसणारी गोष्ट म्हणजे इमारतीवर काही काम चालू असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आठव्या मजल्याच्या उंचीवर संरक्षक जाळी बसवण्यात आली होती आणि रोनाल्डला गोळी लागली नसती तर तो त्या जाळीवर पडून वाचला असता. याचाच अर्थ आता रोनाल्डचा मृत्यू ही आत्महत्या न ठरता खून ठरला.

ज्या खोलीच्या खिडकीतून गोळी बाहेर पडून रोनाल्डच्या डोक्यात शिरली तिच्यात एक वयोवृद्ध दांपत्य रहात होते.त्या नवराबायकोमध्ये जोरदार भांडण चालू होते.आणि नवरा आपल्या बायकोला शॉटगनने मारण्याची धमकी देत होता आणि रागारागात त्याने झाडलेली गोळी त्याच्या बायकोला न लागता खिडकीतून बाहेर पडून रोनाल्डला लागली आणि अशा प्रकारे जरी त्याला गोळी बायकोला मारायची होती तरी ती रोनाल्डला लागल्यामुळे तोच रोनाल्डच्या खुनास कारणीभूत झाला. अर्थातच त्याच्यावरच रोनाल्डच्या खुनाचा आरोप आला.पण त्यावर तो वृद्ध आणि त्याची बायको दोघेही ठामपणे सांगू लागले की शॉटगनमध्ये गोळी नाही असा त्यांचा समज होता. वृद्धाच्या सांगण्यावरून या प्रकारे बायकोला भिववण्याची हे त्याची जुनी संवय होती आणि तिला मारण्याचा त्याचा उद्देशही नव्हता.बंदुकीत गोळी चुकून भरली गेली होती आणि ही गोष्ट त्या दोघांनाही माहीत नव्हती.तपासणीअंती एक साक्षीदार असा मिळाला की त्याच्या सांगण्यावरून वृद्ध दांपत्य खरेच बोलत होते असे सिद्ध झाले.साक्षीदाराने या अपघातापूर्वी सहा आठवडे वृद्ध दांपत्याच्या तरुण मुलास बंदुकीत बार भरताना पाहिले होते.हा मुलगा आयतोबा असल्याने त्याचा उदरनिर्वाह त्याची आई त्याला देत असलेला आर्थिक मदतीवर चालत असे.आणि अलीकडे  त्याचा भत्ता तिने एकदम निम्म्यावर आणला होता त्यामुळे संतापून जाऊन त्याने हा उद्योग केला होता.आपल्या वडिलांची सवय त्याला माहीत असल्यामुळे आपोआपच त्यांच्या हातून आईचा घात होईल ही त्याची कल्पना !

बंदुकीत गोळ्या भरताना त्याचा उद्देशच खुनाचा असल्यामुळे जरी त्याने प्रत्यक्ष रोनाल्डवर गोळी झाडली नसली तरी  खुनाचा आरोप त्याच्यावरच येत होता. सगळ्यात विचित्र आणि मजेशीर गोष्ट म्हणजे पुढील तपासा अंती रोनाल्ड हाच त्या दांपत्याचा मुलगा आहे ही गोष्ट बाहेर आली. सहा आठवडे झाले तरी आईच्या खुनाचा आपला बेत यशस्वी न झाल्याने निराश हो ऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यानेच बंदुकीत भरलेल्या गोळीने त्याला संपवले होते. थोडक्यात त्यानेच स्वत:चा खून केला होता म्हणून डॉ.मिल्सनी शेवटी ही आत्महत्याच आहे असा निष्कर्ष काढला.