ओशो आणि मी (एक)

सुमारे अठरा वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. सगळं मनाजोगतं जमून आलं होतं; घर, गाडी, स्वतःच ऑफिस, उत्तम क्वालिफिकेशन, बायको, एक मुलगा,... जे जे काही हवं होतं ते सर्व मिळवलं होतं पण ती अस्वस्थता मात्र पूर्वी सारखीच होती. मला या विरोधाभासाचा उलगडा होईना, जी अस्वस्थता दूर होण्यासाठी सर्व केलं होतं ती जशीच्या तशी होती!

एक दिवस यात आणखी एका गोष्टीची भर पडली, मला लक्षात आलं की आता जीवनाचा उतार सुरू होईल, एक दिवस हे सगळं असहाय होत संपून जाईल. आय विल बी फिनिश्ड, आयदर ऑन अ हॉस्पिटल बेड ऑर ऑन माय ओन बेड! मी पुरता अस्वस्थ झालो, माझं कशात लक्ष लागेना, मनात आलेला हा विचार मला काही केल्या परतवता येईना.

हे काय कमी होतं की मनानं पुन्हा नवा सवाल उभा केला, जर पुनर्जन्म असेल तर हे सगळं पुन्हा उभं करायचं?

आता तर मी पुरताच खचलो, पुन्हा सी. ए. ची परीक्षा? किती दिवसांनी परीक्षेला जायला उशीर झालाय, आपण तयारी एका विषयाची केली होती आणि भलताच पेपर आलाय, हॉल मध्ये आपण सुन्न बसलोय काहीच आठवत नाहीये असली भेदी स्वप्न पडायची बंद झाली होती, पुन्हा सगळं? पुन्हा ते बालपण, परत ते स्वतःच्या पायावर उभं राहणं?

जगण्याचे एक एक अनुभव घेताना देवा वरचा विश्वास केव्हाच उडाला होता, तो तारेल, तो सगळं काही ठीक करेल हा बावळट विचार कदापि ही मंजूर होणार नव्हता. आता न पैशाचा उपयोग, न नात्यांचा, न मित्रांचा, न मिळवलेल्या ज्ञानाचा. मी सर्वस्वी एकटा पडलो, नाऊ आय वॉज कंप्लीटली गॉन! जगायचं म्हटलं तर ओढावं लागतंय आणि सोडायचं म्हटलं तरी शक्य नाही अशी अवस्था झाली.

असेच एकदा मी आणि बायको जेवण झाल्यावर फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि जवळच राहणाऱ्या मित्राकडे गप्पा मारायला गेलो. कॉफी घेताना माझं लक्ष तिथे टेबलवर पडलेल्या एका पुस्तका कडे गेलं 'मेडीटेशन द फस्ट अँड द लास्ट फ्रिडम', ओशो. मी पुस्तक वाचायला लागलो आणि एका वेगळ्याच तरलतेत शिरायला लागलो. मित्राला ते पुस्तक भेट मिळालं होतं तो ते वाचणार नव्हता, मी पुस्तक घेऊन घरी आलो.

त्या पुस्तकात मी इतका गुंतलो की ओशोंच्या एकेका वाक्याला दाद देताना मी सरळ लाल पेनानं ती वाक्य अधोरेखीत करत गेलो. आता ते पुस्तक माझं झालं! दोन तीन महीने झाले असतील मी मित्राला विचारलं 'अरे, तुला ते पुस्तक हवंय का? तो म्हणाला 'हो, मला वाचायचं होतं. '

आता मला नवं पुस्तक विकत घेऊन त्याला द्यावं लागणार होतं. पुस्तक मिळेल असं एकच ठिकाण होतं 'ओशो कम्यून'. एक दिवस भल्या सकाळी उठून मी कम्यून गेलो आणि ओशोंना सामोरा झालो!

संजय

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १