ओशो आणि मी (दोन)

(आता मला नवं पुस्तक विकत घेऊन त्याला द्यावं लागणार होतं. पुस्तक मिळेल असं एकच ठिकाण होतं 'ओशो कम्यून'. एक दिवस भल्या सकाळी उठून मी कम्यून गेलो आणि ओशोंना सामोरा झालो! )

पुस्तकाचं निमीत्त झालं पण कम्यूनचा माहौल पाहून मी पुरता प्रभावित झालो. एकसोएक लावण्यमुग्ध युवती, अत्यंत प्रोफेशनल मॅनरिझम, प्रत्येक रचनेतलं नजर वेधून घेणारं सौंदर्य मग ती बसायच्या संगमरवरी कट्ट्यावरची गोल मृदू स्पर्शी काळी कुशन्स असोत की ओशोंच्या पुस्तकांची कव्हरर्स असोत की एकेकाचे सिल्की मरून रोब असोत. वेड लावेल असं लँडस्केपींग, नुसत्या वेगवेगळ्या आकारच्या दगडांच्या रचनेतून साकारलेले आकृतीबंध, शांतपणे बसून एकत राहावं असं त्यातून वाहणारं पाणी आणि अचानक कुठूनसे येऊन नाचणारे मोर! जर या आश्रमात एकदा तरी गेलो नाही तर आयुष्य व्यर्थ होईल असं वाटायला लागलं.

आश्रमाचं सदस्यत्व मिळवण्या साठी तीन महिने लिमीटेड पास वर डायनॅमिक मेडिटेशन करावं लागणार होतं. मी पहिला मरून रोब खरेदी केला आणि तिथेच परिधान केला, माय गॉड! माझ्या चित्तवृतीच बदलून गेल्या, आय वॉज ट्रान्सपोरटेड इन अ डिफरंट वर्ल्ड.

माझ्या सॅक मध्ये मरून रोब बघून घरी हलकल्लोळ झाला. आता मी आयुष्यातून उठलो आणि आपल्या मुलीच्या अयुष्याची वाताहत होणार म्हणून सासूबाईंनी चक्क हंबरडा फोडला! बायको निमूटणे तिच्या आईला सामिल झाली. माझे आई वडील तटस्थ होते. मी तुला सोडून जाणार नाही असं हरतऱ्हेनं पटवून देखील बायकोची समजूत निघता निघेना, मी पुन्हा एकटा पडलो. पण आश्रमात जाण्याची ओढ मला रोज पहाटे चार साडे चारला उठवून बरोबर पावणे सहाला आश्रमात न्यायला लागली.

मी तीन महिने ईमानदारीनं मेडिटेशन करून सुद्धा इंटरव्ह्यूला मला फुल पास नाकारला गेला आणि पुन्हा महिनाभर मेडिटेशन करायला हवं असं सांगून परत लिमीटेड पास दिला गेला. मी परत जिद्दीनं महिनाभर डायनॅमिक केलं तेव्हा मला फक्त तीन दिवसाचा फुल पास मिळाला आणि मी स्वर्गात प्रवेश केला!

आश्रम म्हणजे माणसानी स्वर्ग म्हणून जी काय कल्पना केली असेल तो ओशोंनी पृथ्वीवर उतरवला होता. एका अत्यंत विस्तर्ण संगमरवरी गोलाकार चवथऱ्यावर दोन एक हजार लोक एका वेळी बसू शकतील असा विस्तीर्ण मंडप. ऊंचावरून जमिनीलगत निमुळत्या होत गेलेल्या त्याच्या कनाती आणि नजर जिथपर्यंत सहज वर जाऊ शकेल अशा लेव्हलला असलेली पारदर्शक जाळी तुम्हाला वनराईतच आहात असा फिल द्यायची. सभोवताली गर्द झाडी आणि निरव शांतता त्यात फक्त वेगवेगळ्या पक्षांचे अधून मधून एकू येणारे चित्तवेधक आवाज. ओशो ज्या पोडियमवरून संवाद साधत तो ऐसपैस संगमवरवरी पोडियम तिथे इझेलवर ठेवलेला ओशोंचा मिस्टिकल फोटोग्राफ आणि अत्यंत संवेदनाक्षम आणि अत्युच्च दर्जाची ऑडिओ सिस्टम. शांतपणे डोळे मिटले तर प्रत्यक्ष ओशोच तुमच्याशी बोलतायंत असा फिल देणारा तो बुद्धा हॉल आणि मधूनच ऊंचच्या ऊंच बांबूचे सनातन वृक्ष वाऱ्याच्या झोतानी हालले की होणारा बांबूचा क्रॅकल आणि निर्माण होणारी अनाकलनीय अनिश्चितता!

एखादा डोह भासावा असा काळ्या टाईल्स तळाशी बसवलेला कमनीय आणि लोभस आकाराचा विस्तिर्ण स्विमींग पूल! तो शांत पूल बघितला की कुणालाही वाटावं आपण राजहंस व्हाव आणि त्या पाण्यात जलविहार करावा इतका जीवघेणा.

जीव गेला तरी बेहत्तर पण या पूलमध्ये, पाण्याची नजाकत जरा सुद्धा न उसवता, पोहता यायलाच हवं या मोहानी मला पोहायला शिकवलं. मग पुढे पुढे तर त्या विस्तिर्ण जलाशयाशी एकरूप होत तिथे तरंगणाऱ्या गुलबक्षीच्या राणी रंगाच्या कागदी फुलांसारखा मी देहाची नौका पाण्यावर अलगद सोडून वाऱ्याचा झोत जिकडे नेईल तिकडे जात रहायचो.

निरनिराळ्या पाथवेज वर जमिनीला बिलगलेल्या गर्द हिरव्या वेलीतून उभे राहिलेले मंद पथदीप पहाटे आणि रात्री इतके रमणीय दिसायचे की नुसतं त्यांच्या समीप बघत उभं राहावं.

गरम आणि गार पाण्याचे शॉवर्स, सुरेख आणि अत्यंत स्वच्छ वॉशरूम्स त्यात खास कम्यूनसाठी तयार केलेले मंद सुगंधाचे लिक्वीड सोप्स. तासांतास शॉर्वर घेतला तरी मन भरायचं नाही.

प्ले एरीयाज मध्ये तर मी कित्येक तास पडीक असायचो. फॉरिनर्सशी तोडीस तोड खेळता यावं म्हणून टेबलटेनीस शिकलो. बॅडमिंटन आणि टेनीसची ओपन एअर कोर्टस आणि मरून स्पोर्टसवेअर परिधान करून खेळणारे प्लेअर्स बघीतले की खेळ हे जीवनाचं किती अनन्य साधारण परिमाण आहे ते कळायचं.

प्ले एरियाच्या लगत डान्स आणि पेंटींग्जचे सेमी ओपन हॉल्स. तिथे संध्याकाळी होणाऱ्या व्हाईट रोब ब्रदरहूड साठी कंपोझ केलेल्या अनेकानेक ट्यून्सवर लयबद्ध नृत्य करणाऱ्या नितांत सुंदर तरूणी आणि एखादा कमालीचा ग्रेसफुल नर्तक.

संपूर्ण मुक्त, अनिर्बंध आणि कमालीचं स्वच्छंदी वातावरण, अट फक्त एकच 'यू वोंट डिस्टर्ब दी अदर'. जगभरातल्या एकेक देशाच्या एकसोएक सुंदर युवती पण तुम्ही जराशी जरी बेअदबी केली आणि तिनं व्हॅलिड कंप्लेंट केली तर तुमचा पास त्या क्षणी काढून घेतला जाईल, अँड द हेवन वील बी क्लोज्ड टू यू फॉर एव्हर! देअर वील बी नो अपील व्हॉटसोएव्हर, यू वील हॅव मिस्ड अ लाईफ टाईम ऑपॉरच्युनिटी.

ऑरगॅनिकली ग्रोन फूडच्या तरतऱ्हेच्या रेसिपीज असलेली सेव्हन स्टार हॉटेल सदृश रेस्टॉरंटस की जिथे जेवल्यावर डोळे मिटून फक्त कृतज्ञता निर्माण व्हावी आणि अन्नाला ब्रह्म का म्हटलंय ते कळावं.

ओशोंची पुस्तकं असलेलं बुक शॉप जिथे बसलं की तुम्हाला दिवस आणि रात्र सारखीच वाटावी अशी प्रकाश योजना. कुणीकुणी वाजवलेल्या कायकाय मंद सुरावटींनी भारलेलं वातावरण आणि हे उघडू का ते अशी मोहमयी जादू घालणारी ओशोंची पुस्तकं. झेन, गीता, बुद्ध, महावीर, उपनिषदं, सूफीझम, तंत्रसूत्र, पातंजलींची योगसूत्र, बायबल, कुराण, अष्टावक्र, मीरा, नानक, कबीर, अशा अनंत विषयावर या अथांग माणसानी केलेली अफलातून भाष्य आणि प्रत्येक पुस्तकाचं स्वतःचं असं शांत, स्थिर, आमंत्रण! असा एक ही दिवस गेला नाही की मी बुक शॉपमध्ये गेलो आणि ओशोंचं नवं पुस्तक खरेदी केलं नाही. चाळीस एक हजार रूपयांची पुस्तकं मी सहज खरेदी केली असतील आणि त्यातला शब्दनं शब्द ओशोंशी रूबरू बोलावं तसा मी रात्ररात्र जागून वाचलांय. या प्रत्येक पुस्तकानी मला दाही दिशांनी मोकळं करत नेलंय!

आश्रमात सर्वात कहर काय असेल तर ती ओशोंची समधी! जगातल्या कोणत्याही सिद्धाची अशी समाधी नाही कारण ती ऐय्याशी, तो रूतबा आणि ती नजाकत आता होणे नाही.

 पूर्वप्रकाशन दुवा क्र. १