नारो शंकराची घंटा ...!!

त्या दगडी देवळाच्या मुख्य दरवाजावर 
कोरलेल्या अर्धवर्तुळात ती घंटा 
पितळेची ,कदाचित पंचधातूची 
पुरुषभर उंचीची 
घनघोर आवाजाची 
खालूनच नदी वाहतेय गोदावरी 
आखीव रेखीव काठ 
शिसवी रंगाच्या कभिन्न  दगडांनी बांधलेला किनारां 
पावसाळ्यात त्यावरून वाहणारे झुळझुळ पाणी 
पायावरून वेलांटत   नागमोडी पसरत सरकणारे   
पाय भिजवीत महादेवाच्या दर्शनाला गेल्याची बारीकशी आठवण 
  
मंदिरात घुसताना घंटेचे दर्शन 
घाबरून जायचो तिच्या आकाराने 
बेलाचे पान वाहताना डोळे मिटून घ्यायचो 
तेव्हा घंटाच यायची डोळ्यासमोर 
  
घंटा तशी बर्याच उंचीवर 
महापुरात देखील पाणी नाही लागत तिच्या घंटीला  
जेव्हा लागेल तेव्हा  सगळे गाव जाईल वाहून 
घंटा आता आतां कोणीच वाजवत नाही 
वाजवल्याचे कधी ऐकलेपण नाही  
तिच्या बद्दल एक भीतीयुक्त दरारा 
पुराच्या पाण्यानेच कधीतरी  वाजली होती घंटा
तेव्हा जगबुडी आल्याचा वास पसरला होता सर्वत्र 
तेव्हा नाग बसला होता वेटोळे घालून त्या घंटीतल्या लोलकाला
तेव्हां शिव शंभोने गावाला धरले होते डोक्यावर 
 
परवाच सहज गेलो  
लहानपणची आठवण शोधायला 
त्या अर्धवर्तुळात  घंटी पार केविलवाणी दिसत होती 
केविलवाण्या अवस्थेत कशीबशी सावरून उभी होती 
खाली महारोग्यान्चा जथा
शिवशंभो पण कोठेतरी हरवलेला वाटला 
माश्यासारखी थारोळलेली   गर्दी 
सर्वत्र भकास केविलवाणी 
घंटापण तिरपी करून बांधून ठेवलेली 
कधीपण पडू शकते 
कडकडीत उन्हात मी गलितगात्र 
केविलवाणा ....!!
माझी उंची वाढली होती 
माझ्या लहानपणची 
घंटा आता छोटी झाली होती ..... ..!!