बाबुरावची त्यानंतर मात्र दररोजच गाठ पडू लागली. त्याचे लग्न अगदी लहानपणीच म्हणजे त्याला काही कळायला लागण्यापूर्वीच झाल्याचे त्याने मला सांगितले.
" आमच्या कम्युनिटीत हे असेच असते एस. जी. "
" अरे आमच्यामध्येसुद्धा पूर्वी पाळण्यात सुद्धा लग्न होत होती. पण आता मात्र सगळ बदलल आहे. " मी त्याला सावरून घ्यायचा प्रयत्न केला.
" आमच्यातही होईल हळू हळू तो बदल. पण तोपयंत हे असच चालायच. " आमच्यात बहुतेक संवाद घडे तो कॉलेजातच पण एकदिवस मात्र बाबुराव एकदम माझ्या घरीच आला. मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण गावात गेल्यावर त्याच्या घरी मी डोकावत असलो तरी तो असा उलटा कधी माझ्या घरी आला नव्हता अर्थात मी त्याचे स्वागतच केले. त्याचा चेहरा नेहमीपेक्षा खूपच खुललेला दिसला. मध्यंतरी त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला पारच नाहीसा झाला होता
त्याला पूर्वीसारखे पाहून मलाही खूप बरे वाटले.
" एस. जी. तुझे पैसे द्यायला आलोय! "
" अरेवा पण तरीही मला वाटते बाबुराव, पैसे द्यायला मुद्दाम घरी येणार नाहीस ते कॉलेजमध्येही देऊ शकला असतास. तुझा चेहरा काहीतरी वेगळेच सांगतोय "
अरे नाय नाय नाय उगीच काहीतरी निष्कर्ष काढू नकोस. "एकदम त्याच्या स्टाइलमध्ये तो बोलला त्यामुळे तर मला आणखीच खात्री झाली की काहीतरी पाणी मुरतय. पण तरीही तो काही बोलला नाही. आणि चहा घेऊन तो निघाला पण मग एकदम त्याला काय वाटले कोणास ठाऊक पण मग माझा हात पकडून तो एकदम म्हणाला,
" एस. जी. खरे सांगू का मी खरेच आज खुशीत आहे. आणि तुला सांगायला काही हरकत नाही पण पुढच्या महिन्यात मी लग्न करतोय. "
" वा फारच चांगली बातमी आणलीस " मी मनात जरी आश्चर्यचकित झालो असलो तरी अशा बातमीवर अपेक्षित प्रतिक्रिया हीच होती.
" तुला आश्चर्य वाटले असेल ना? "
थोडक्यात पहिली बायको गेल्यावर इतक्या लगेच हा लग्न करेल याचे आम्हाला वाटत असलेले आश्चर्य त्याने ओळखले होते. पण तसे उघडपणे मान्य करणे मला जड गेले आणि माझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.
" अरे तसे काही नाही "
बाबुरावने आमच्या विभागातील सर्वांना लग्नास बोलावले पण अर्थातच त्याच्या खेडेगावात जाऊन लग्नास हजर राहणे कोणालाच जमले नाही मग त्याने लग्नानंतर छोटीशी पार्टी दिली आणि त्यावेळी मात्र सगळे जण हजर राहिले आणि आपल्या नव्या बायकोची त्याने सगळ्यांशी ओळख करून दिली. त्याला शोभेलशीच होती ती. मुख्य म्हणजे सर्वांशी तिने विशेष न अडखळता बोलण्याचा प्रयत्न केला.
आमच्या विभागातील सगळ्या तरुण प्राध्यापकांचा एक अगदी छान ग्रुप जमला होता. हळू हळू सगळ्यांची लग्ने जमली आणि झाली आणि बऱ्याच वेळा आम्ही एकत्र जमायचो आपल्या बायकांना घेऊनही. औरंगाबाद त्यावेळी लहानच असल्यामुळे एकमेकांकडे जाणे होतच असे. मात्र याला अपवाद फक्त बंगाळेचा. तो आमच्यात चांगला मिसळत असे पण बहुधा एकटाच.
कधीकधी आपण इतके जवळ येतो की आपली मैत्री अगदी चिरंतन टिकणार असा आभास होतो आणि लगेचच "यथा काष्ठं च काष्ठं च " या उक्तीचा अनुभव येतो.
तसाच अनुभव आम्हालाही आला कारण एकदम सगळ्यांच्या निरनिराळ्या ठिकाणी बदल्या झाल्या. त्याही अशा ठिकाणी की परत आमच्या गाठी अगदी मुद्दाम ठरवल्याशिवाय पडणे शक्यच नव्हते. मध्ये बरीच वर्षे गेली. जितक्या सहजतेने आम्ही एकत्र आलो होतो तितक्याच सहजतेने दुरावलो आणि त्याची फारशी खंत कुणालाच वाटली नाही. पुन्हा नव्या ठिकाणी नव्या ओळखी झाल्या ग्रुप्स जमले. औरंगाबादला आपण परत जाऊ अशी मला आशाही उरली नाही. परत जाण्यासारखे काही आकर्षणही उरले नव्हते. येऊन जाऊन एक प्लॉट तोही आमच्या नसते उपद्व्याप करणाऱ्या मित्राने गळ्यातच घातला म्हणून होता तोही विकून टाकावा अशा निष्कर्षाप्रत मी येऊ लागलो होतो. कारण अशा मालमत्तेची संवय नव्हती मग कशाला उगीच नसती ब्याद गळ्यात राहू द्यायची इतका संकुचित दृष्टिकोण माझा. पण तसे घडण्यापूर्वीच माझी बदली पुन्हा औरंगाबादलाच झाले आणि योगायोगाने आमच्यापैकी सगळेचजण हळू हळू पुन्हा औरंगाबादलाच एकत्र आलो.
बंगाळेची गोष्ट वेगळीच होती. तो मात्र या बदलीच्या सत्रातून सुटला होता त्यामुळे आम्ही परत येण्याच्या सुमारास गावात अगदी मध्यवस्तीत मोठे घर बांधून तो राहू लागला होता. पुन्हा आमच्या गाठीभेटी होऊ लागल्या. यावेळी शासकीय सदनिका न मिळाल्यामुळे मला भाड्याच्या जागेत राहावे लागत होते आणि त्यामुळे आपल्या प्लॉटवर बांधकाम करावे असे वाटू लागले. त्यात अडचणी होत्या पण येनकेन प्रकारेण त्या दूर झाल्या आणि माझ्या कुवतीप्रमाणे छोटेसे घर बांधून मी तेथे राहू लागलो. या घराचे बांधकाम चालू असताना एकदोन वेळा त्याच्या या घरात जाण्याचा योग आला होता. त्याला स्वत:ला रहायला मोठे घर तर होतेच शिवाय एक दोन भाडेकरू पण राहू शकतील अशी सोय त्या घरात होती. त्याच्या घरात बरीच माणसे असत. आमच्या सोसायटीत बहुतेक आमचे मित्रच होते त्यामुळे आम्ही कधी एकत्र जमत असू त्यावेळी बंगाळेसही बोलावत असू. त्यामुळे की काय कोण जाणे आमच्या सोसायटीत आपले घर असावे असे त्याला वाटू लागले. त्याच्या घरात बरीच माणसे असल्यामुळेही कदाचित आपल्या बायकापोरांना घेऊन स्वतंत्र राहण्याची इच्छा कदाचित त्यामागे असेल.
त्यावेळी आमच्या सोसायटीत खरोखरच काही प्लॉटस मोकळेच होते. त्यातल्या एका प्लॉटला जरा मजेशीर इतिहास होता. त्या प्लॉटचे मालक आमचेच एक सहकारी बाबरीकर म्हणून होते. आमच्या बदल्या झाल्या त्या काळात ते सेवानिवृत्त झाल्यामुळे ते औरंगाबादलाच राहिले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे वास्तव्य असलेली शासकीय सदनिका त्याना सेवानिवृत्तीमुळे सोडावी लागली आणि ते काही कोणी मंत्री, खासदार नसल्यामुळे अशा नियमांना बगल घालून आपल्या ताब्यातली सदनिका बळकावणे त्याना जमणार नव्हते. म्हणून आपल्या या जागेवर बांधकाम करून राहावे असा विचार ते करू लागले. पण त्यांना त्या प्लॉटवर तो फारच उंचसखल असल्याने बांधकाम करायला अवघड जाऊ लागले. त्यावेळी आमच्या ऐपतीस साजेसे बांधकाम म्हणजे झोपडी उभारणे हाच काय तो पर्याय असताना निदान ज्या जमिनीवर ती उभी करायची ती तरी जरा समपातळीत असणे आवश्यक असल्याने बाबरीकरांनी अध्यक्षांच्या खनपटीस बसून त्यांचा प्लॉट बदलून मिळावा असा आग्रह धरला.
अध्यक्षानी बाबरीकराना वेगळाच सल्ला दिला. त्यावेळी आमचे प्लॉटस अगदी निबिड अरण्यातच आहेत असे वाटत असल्याने बऱ्याच सभासदांना ते ठेवावे असे वाटत नव्हते विशेषत: जे सभासद औरंगाबादला नव्हते अशांना. अगदी मलासुद्धा माझी सोलापूरला बदली झाल्यामुळे काय करायचाय तो प्लॉट ठेवून असा विचार माझ्याही मनात घोळतच होता. भूखंडाचे श्रीखंड होत असते हे जाणण्याची अक्कल तेव्हां नव्हती (आणि आताही नाही). अशाच एक सखल प्लॉट विकू इच्छिणाऱ्या एका सभासदास गाठून त्याचा प्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधण्याचा सल्ला अध्यक्षांनी बाबरीकरांना दिला. एकाच सोसायटीत एका व्यक्तीच्या नावावर दोन प्लॉटस नसावेत या नियमाचे ते उल्लंघन होते त्यामुळे त्या प्लॉटचे हस्तांतरण संस्थेच्या काही सभासदांच्या मनाविरुद्ध झाले. आणि त्यावर घरही नगरपरिषदेच्या परवानगीवाचूनच बांधून त्यावर बाबरीकर रहायला पण लागले, आणि त्यांचाही मोठा प्लॉट रिकामाच पण तो त्यांच्या नावावर राहिला. तो प्लॉट माझ्या प्लॉटला लागून होता.
आम्ही सर्व सभासद बदलून पुन्हा औरंगाबादला परत आल्यावर मात्र बाबरीकरांच्या नावावर दोन प्लॉट असणे सगळ्यांना खुपू लागले. तो प्लॉट त्यांनी संस्थेस मूळ किंमतीस परत करावा असा आग्रह आम्ही सभासदांनी त्याना करायला सुरवात केली. म्हणजे त्याचा आम्हाला काही उपद्रव होता अशातला भाग नव्हता पण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नियमाप्रमाणे एकाच व्यक्तीला दोन प्लॉट धारण करता येत नाहीत असा नियमही होता पण आता त्या भागातील जागेचे भाव बऱ्यापैकी वाढू लागल्यामुळे अर्थात बाबरीकरांना आमचा आग्रह मान्य होत नव्हता. खरे तर बाबरीकरांनी संस्थेच्या सर्व साधारण सभेत ठराव करून दुसरा प्लॉट घेतला होता. अर्थात त्या सभेस अगदी चारच सभासद उपस्थित होते आणि त्यातील एकाने या प्रकारच्या हस्तांतरणाला विरोध दर्शवला होता त्यामुळे नियमानुसार झालेला पण तो कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रकार होता. हल्ली शासनही असे वागतच असते आणि त्यास विरोध करणाऱ्यांच्या जिवावरही बेतत असते.
मी सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यावर हा प्रश्न तडीस लावण्याचे मनावर घेतले. खरे तर यापेक्षा घर बांधणे मी मनावर घेतले असते तर ते अधिक योग्य ठरले असते पण त्यासाठी काही कायदेशीर बाबींची पूर्ती करणे आवश्यक होते कारण बाब्रीकरांनी बांधले त्या पद्धतीने घर बांधण्याचे धाडस माझ्याकडे नव्हते. शिवाय त्यासाठी लागणारे धन तेही माझ्याजवळ अभावानेच होते अर्थात बसल्याबसल्या पत्रव्यवहार करून संस्थेचा फायदा करून देण्याचा विचार मी केला आणि ज्यादा असलेला प्लॉट बाबरीकरांनी संस्थेस मूळ किंमतीस परत करावा अशी पत्रे पाठवण्याचा मी सपाटा लावला. त्याचा एकच परिणाम झाला तो म्हणजे मी उगीचच बाबरीकरांचे शत्रुत्व पदरी घेतले.
त्याच वेळी बंगाळेने माझ्याकडे येऊन तो प्लॉट आपल्याला मिळावा असा मनोदय त्याने व्यक्त केला व संस्थेचा सचिव या नात्याने संस्थेची सभा बोलावून या विषयावर चर्चा केली. आमची मजल आणखीच पुढे जाऊन आम्ही तो प्लॉट बंगाळेला परस्पर विकूनही टाकला. आमच्या या कारवाईमुळे सर्व संस्थेच्या सभासदांनाच बाबरीकरांनी शत्रू मानायला सुरवात केली होती. आम्हीही त्यांचे आमच्या संस्थेच्या सभासदत्वही रद्द केले त्यामुळे ते सर्वसाधारण सभेस हजर राहत नसले तरी तेथे शिजणाऱ्या गोष्टींचा पूर्ण थांगपत्ता त्याना असे. अर्थातच आम्ही त्यांचा प्लॉट परस्पर विकल्याचेही त्याना माहीत झाले इतकेच काय बंगाळेने त्यावर बांधकाम करू नये म्हणून त्यानी अगोदरच एका शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसा खपून एक झोपडे त्या प्लॉटवर उभारले ( विनापरवाना बांधकामे अशीच उभी राहतात. त्यादिवशी मी परगावी गेलो होतो त्यामुळे झालेला प्रकार मला सौ. कडून कळाला आणि असेही कळले की त्याला हरकत घेणाऱ्या संस्थेच्या सभासदांना किरकोळ मारहाणही करण्यात आली.
बंगाळे तसा स्वभावाने गरीबच. त्याला संस्थेने विकलेल्या प्लॉटवर झोपडे झालेले पाहून आणि तेथे किरकोळ का होईना मारामारीही झाली हे समजल्यावर तर या सगळ्या प्रकरणात आपण उगीचच पडलो असे वाटून त्याने आपला प्लॉट संस्थेस परत करून आपले पैसे परत मागितले. आम्ही जर पुरेसे निर्ढावलेले असतो तर आता ती तुझी जबाबदारी असे म्हणून मोकळे झालो असतो. पण आमच्यापैकी कोणालाच त्या प्लॉटच्या पैशांचा मोह नव्हता आपण तत्वाचा आग्रह धरून एक चुकीची दुरुस्ती करत आहोत असाच आमचा दृष्टिकोण होता. त्यामुळे आम्ही त्याला पैसे परत करून मोकळे केले.
पण बंगाळेला या प्लॉटचा मोह अजून होताच आणि त्याला काहीजणांनी सल्ला दिला की त्याने बाबरीकरशी स्वतंत्रपणे बोलून त्यांच्याकडूनच तो प्लॉट विकत घ्यावा. असा सल्ला देणारे आमच्या संस्थेचे सभासदच होते म्हणजे एकापरीने बाबरीकरांचा प्लॉटवरील हक्क आम्ही मान्यच केला होता पण आता सरळ सरळ ते आम्ही कबूल करत नव्हतो इतकेच.
आश्चर्य म्हणजे बंगाळेने कसे काय कोण जाणे पण बाबरीकरांना पटवले आणि तो प्लॉट त्यांच्याकडून घेतला म्हणजे आता त्यावरील हक्क त्यानी सोडला. संस्थेने तर तो प्लॉट त्यांच्या नावावर नाही असेच दाखवले होते त्यामुळे संस्थेने थोडी देणगी स्वीकारून तो प्लॉट त्याच्या नावावर केला. आणि त्यानेही त्या प्लॉटवर बांधकाम चालू केले त्यावेळी माझ्या घराचे बांधकाम अर्धवट पूर्ण झाल्यामुळे मी तेथे रहायला सुरवात केली होती आणि त्यामुळे बंगाळे आपल्या बांधकामास भेट द्यायला आल्यावर आमची गाठ पडत असे. कधीकधी तो आपल्या छोट्या मुलालाही बरोबर आणीत असे. कधी माझ्याकडे थोडावेळ थांबून चहा पिऊन जात असे.
पण काही कारणाने पुन्हा त्याची बदली झाली आणि त्याचा प्लॉट तसाच मोकळा पडला. त्या काळात त्याच्या बांधकामासाठी त्याने घेतलेल्या नळजोडणीचा फायदा मला आणि संस्थेच्या बऱ्याच सदस्याना जे आता घर बांधून त्या भागात रहायला लागले होते त्याना झाला. वर्ष दोन वर्षे तो प्लॉट तसाच बेवारशी असल्यासारखा पडला होता आणि अचानक बंगाळेची बदली पुन्हा औरंगाबादला झाली आणि मग त्याने पुन्हा घर बांधण्याचा उपक्रम हाती घेतला