तुम्हाला काय करायचय? तुम्ही काय करू शकता?

काही दिवसांपूर्वी मी एका फोटोग्राफरची गोष्ट वाचली. त्याला लहान असताना
एक जुना कॅमेरा कचऱ्यात टाकलेला मिळाला, आणि त्या दिवसापासून फोटो
काढण्याची आवड सुरू झाली. तो फार गरीब होता म्हणून त्याला चांगला कॅमेरा
घेता आला नाही. त्याला फोटोग्राफर बनायचं होतं पण प्रदर्शनासाठी लागणारे
पैसे त्याच्याकडे नव्हते. बरेच प्रयत्न केले, कंपन्यांकडे जाऊन मदत
मागितली पण काहीच झाले नाही. तरीही त्याला त्याचे फोटो लोकांना दाखवायचे
होते, फोटो काढत राहायचं होतं आणि मोठा फोटोग्राफर बनायचं होतं.
प्रदर्शनासाठी पैसे नव्हते, जागा नव्हती. बरेच दिवस निराश राहिल्यावर
त्याने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने
फोटोंचे मोठे पोस्टर करून सगळीकडे लावायचे ठरवले. सगळीकडे म्हणजे सगळीकडे,
रेल्वे स्टेशनावर, दुकानाच्या बाहेरच्या भिंतींवर, सिग्नलवर, गार्डनच्या
बाकड्यांवर, म्हणजे थोडक्यात लोकांना दिसतील अशा ठिकाणांवर. पोस्टर अगदी
साधे होतो, रंगीत नव्हते आणि साध्या कागदावर छापलेले. पण संपूर्ण शहर
त्याच्या फोटोंचं प्रदर्शन होतं. बरेच वेळा पोलिसांनी पकडून तुरुंगात
टाकलं कारण काही ठिकाणी फोटो लावणं कायदेशीर नव्हतं. पण तुरुंगातून बाहेर
आल्यावर त्याने परत तेच काम करत राहायची जिद्द सोडली नाही. जसे जसे फोटो
वाढू लागले, तसे लोकं 'हे फोटो कुणी काढले?' असे प्रश्न विचारू लागले.
लोकांना फोटो आवडू लागले कारण त्यांच्या मागे एक संघर्ष होता, काहीतरी
करून दाखवण्याची जिद्द होती. काहीच वर्षात मोठ्या-मोठ्या कंपन्या
त्याच्याकडे जाहिराती करून घेण्यासाठी आल्या. पैसा मिळायला लागला, कॅमेरे
बदलू लागले, मित्र वाढू लागले आणि कामं वाढू लागली. पण कितीही नवे कॅमेरे
मिळाले तरी त्याचा कचऱ्या मिळालेला कॅमेरा अजूनही त्याच्याकडे आहे, आणि
कितीही काम असलं तरी त्याला आवडणारं संपूर्ण शहरातलं प्रदर्शन अजूनही
भरतं. आता तो दुसऱ्या नव्या फोटोग्राफर्सचे फोटो पण सगळीकडे लावतो. जितकं
मोठ्या कंपन्यांसाठी पैशासाठी कामं करतो, त्याच्यापेक्षा जास्त काम
समाजसेवा म्हणून करतो. नव्या फोटोग्राफर्सना तर मदत करतोच, पण एन.जी.ओ.
साठी विनामूल्य पण कामं करतो. मध्ये त्याने आफ्रिकेत जाऊन तिथल्या
एच.आय.व्ही. ग्रस्त महिलांसाठी काम केले. कामे म्हणजे त्यांच्या रोजच्या
जीवनातले प्रसंग आणि त्यांच्या समस्या त्याच्या कॅमेऱ्यातून लोकांपर्यंत
पोचवले. मी त्याचं नाव न लिहिता फक्त 'तो' आणि 'त्याने' असं म्हणतो आहे,
याला पण एक कारण आहे. त्याचं नाव कोणालाच माहीत नाही, तो स्वतः:चा फक्त
जे.आर. असा परिचय करून देतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं नाव
महत्त्वाचं नाही त्याचं काम महत्त्वाचं आहे. आज त्याने त्याच्या कलेतून
कितीतरी लोकांची जीवन बदलली आहेत. हे सगळं करताना त्याचं नाव कोणालाही
माहीत नाही, आणि पैशाची किंवा प्रसिद्धीची लालसा नाही. त्याला फक्त
त्याने काढलेले फोटो लेकांना दाखवायचे होते, पण आज त्याच्या कलेतून त्याने
हे जग चांगल्यासाठी बदलले आहे. आपल्याला आवडत असलेलं काम करताना आपण
स्वतः:लाच नही तर दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकतो.

'तुम्ही काय करू शकता?' या प्रश्नाचं उत्तर, जे.आर. सारख्या कलाकारांकडे
बघून, 'तुम्ही काहीही करू शकता' असंच देता येईल. दुसरा प्रश्न होता
'तुम्हाला काय करायचंय?' याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. जे.आर. ला फोटो
काढायचे होते, काढत राहायचे होते आणि लोकांपर्यंत पोचवत राहायचे होते.
आवडणाऱ्या गोष्टी करायच्या असतील तर खरंच तुम्ही काहीही करू शकता. कठीण
परिस्थितीत तर भरपूर लोक असतात, पण जे त्यातूनही स्वतः:चा रस्ता तयार करतात
ते लोकांसाठी उदाहरणं बनतात. 'तुम्हाला काय करायचंय?' हे ठरवण्याची
वेळ आज आहे, आता आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात कदाचित तुम्हाला
पैसा मिळणारही नाही, पण खूप आनंद नक्कीच मिळेल. या संगणकाच्या युगात
आपल्याला आवडतं ते करण्याच्या भरपूर संधी आहेत. कुणी फोटोंकडे बघत नव्हतं
तर जे.आर. ने त्याचे फोटो शहरभर लावले. जर लेखक बनायचं असेल तर तुमचं
लिखाण इंटरनेट द्वारे लोकांपर्यंत पोचवा, ईमेल करा किंवा ब्लॉग लिहा.
लोकांना तुमचं लिखाण किंवा तुमचं काम आवडेल की नाही याचा निर्णय लोकांवर
सोपवा. त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला आवडतंय ते करत राहा,
तुम्हाला खरंच खूप आनंद मिळेल. सहसा मी मित्रांना असं सांगायला लागलो की ते
मला दोन कारणं सांगतात. एकतर आवडतंय ते करण्यासाठी पैसे नाहीत नाहीतर वेळ
नाही. आवडत्या गोष्टी करायला वेळ नसेल तर वेळ काढा. आपल्याला एकच आयुष्य
मिळतं, त्यातही आपण आपल्याला नावडत्या गोष्टी करत राहिलो तर आपण मजेत कसे
जगणार. नोकरीमुळे काही लोकांना वेळ मिळत नसेलही, पण संध्याकाळी घरी
आल्यावर, सुट्टीच्या दिवशी किंवा रजा काढल्यावर वेळ मिळू शकतो. हा वेळ आपण
नीट वापरणं गरजेचं आहे. आवडत्या गोष्टी करायला पैसे नाहीत हे पण कारण
बरोबर वाटत नाही. पैसे मिळवण्यासाठी नोकरी करा, किंवा थोडी काटकसर करा.
खरंतर आवडत्या गोष्टी न करण्यासाठी कुठलंच कारण पुरेसं वाटतं नाही. आपण
सगळेच आपल्या कलेने किंवा आपल्या जिद्दीने जगात बदल आणू शकतो, लोकांना पण
आनंद देऊ शकतो.

जर आपण चांगल्या गोष्टी प्रामाणिकपणे करत राहिलो तर लोकं नक्की लक्ष
देतात. याचं उदाहरण म्हणजे माझ्या रोजच्या रस्त्यावर एक बेकरी आहे. मी
सकाळी रस्त्यावरून जाताना त्या बेकरीत तयार होणाऱ्या ताज्या बिस्किटांचा
मस्त सुगंध येतो. हा प्रकार कितीतरी दिवस होत होता. आधी मला ती बेकरी कुठे
आहे ते माहीतही नव्हते, पण त्या वासामुळे मी ती बेकरी शोधली आणि बिस्किट
विकत घेतली. अजूनही तो वास आला की खूप मस्त वाटतं, बिस्किट खावंसं वाटतं.
त्या वासामुळे त्या बेकरीला कसलीही जाहिरात करावी लागली नाही. खरंच तुम्ही
काहीतरी चांगलं करत असाल तर लोकं लक्ष देतात, इतरांना सांगतात. म्हणूनच
आपल्याला आवडतं ते करत राहावं, आणि लोकांना आवडेल की नाही याचा निर्णय
त्यांच्यावर सोपवावा. निखळ आनंद मिळतो म्हणून काहीतरी चांगलं करण्यासारखं
पुण्य नाही. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीतून लोकांना प्रेरणा, मदत आणि आनंद
मिळू शकतो.

-- मयुरेश कुलकर्णी