गजलेच्या नियमात बसाया

यत्न करूनी शेर लिहाया जमले नाही
गजलेच्या नियमात जगाया जमले नाही

मोना, सोना, मीना येती गजलांमधुनी
मज कोण्या एकीत रमाया जमले नाही

निवडुन येणे अवघड नव्हते पण जनतेला
मृगजळ दाउन राज्य कराया जमले नाही

अध्यात्माला कोळुन प्यालो, शिष्य न केले
धर्माचा व्यापार कराया जमले नाही

पापभिरू होऊन जगावे शिकवण होती
देवाचे देणे विसराया जमले नाही

रामायण मी लिहिण्या नव्हतो वाल्याकोळी
लोका लुटणे पोट भराया जमले नाही

वडिलोपार्जित संपत्तीला ठोकरले मी
सोपे जगणे खात किराया जमले नाही

ऐपत जैसी तैसे जगलो संतुष्टीने
देवाला वेठीस धराया जमले नाही

कुजबुज होते "निशिकांता"च्या लडखडण्याने
रूढींच्या परिघात फिराया जमले नाही

निशिकांत देशपांडे मो.नं, ९८९०७ ९९०२३
E mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा