कुणी म्हंटलेच नाही!

                          कुणी म्हंटलेच नाही...
"शस्त्र घेऊनी शत्रूशी लढ ! "कुणी म्हंटलेच नाही..
शस्त्र घेऊनी लढलो असतो आणि जाहलो असतो शूर..
जाहलो असतो राजे आणि न्याराच असता नूर..
पण आम्हांस कुणी कधी असे म्हंटलेच नाही..
आणि शस्त्र-बिस्त्र हाती कधी, आम्ही घेतलेच नाही..
"अंगरखा नेसुनी गडावर चढ !"कुणी म्हंटलेच नाही..
अंगरखा नेसुनी चढलो असतो, त्या उंच गडांवर..  
बसलो असतो बनून राजे सिंहासनावर..
पण आम्हांस कुणी कधी असे म्हंटलेच नाही..
आणि शर्ट- बिर्ट व्यतिरिक्त कधी, आम्ही नेसलेचं नाही.. 
"सळसळू दे तुझे रक्त !" कुणी म्हंटलेच नाही..
सळसळले असते रक्त आमुचे, धरुनी हाती तलवार..
शूरपणाची लकेर उठली असती.. गालावर..
पण आम्हांस कुणी कधी असे म्हंटलेच नाही..
आणि दाता-बिता शिवाय कधी, काही सळसळलेच नाही..
"छत्रपतींच्या पुतळ्यास घाल फुलांचा हार ! " कुणी म्हंटलेच नाही..
घातला असता हार.. काश! स्पर्शिली असती तलवार..
सळसळले असते रक्त.. लागली असती रक्ताची धार..
पण आम्हांस कुणी कधी असे म्हंटलेच नाही..
आणि खोबरं-बिबरं काढण्याशिवाय.. रक्त गळलेचं नाही..
"चल घडव आता इतिहास ! " कुणी म्हंटलेच नाही..
शूर.. वीर .. रक्त .. अशा फक्त कल्पनाचं उरल्या..
रक्ताला सळसळवणार्या घटनाच कुठे घडल्या..
पण आम्हांस कुणी कधी असे म्हंटलेच नाही..
आणि वेळ आली तरीही अतिरेक्यांशी आम्ही लढलोचं नाही..
-- श्रीनिवास गुजर