मी भांडी घासते घरची दहा
या एकदा अन माझा संसार पहा
काय राहता, काय वागता वा रे वा!
माझ्या घरची स्वच्छता पहा
काय भांडता कचाकचा, अन बोलता वचावचा
माझ्या कुटुंबातले प्रेम एकदा पहा
नजरा तुमच्या वखवखलेल्या
शुन्य आहात हो तुम्ही, जरा शिस्तीत रहा
माझी मुले वाट बघतात माझी
जरा का झाले सहा चे साडेसहा
नवऱ्याचा पाय गेला मधुमेहात
माझ्यासाठी कुबडी घेउन दारात उभा असेल पहा
चोर म्हणालात एकदा तुम्ही मला
माझ्या घरची मनाची श्रीमंती एकदा पहा
नाईलाजास्तव मी येते तुमच्या दारी
तुम्हीही या कधीतरी, निदान पाजीन घोटभर चहा