" पहिला नंबर"
ऐकून भ्रष्टाचारात चौथा नंबर,
मनांत खिन्न झालो फार ।
कधी होईल जगी पहिला नंबर,
याचाच करतो सतत विचार ॥ध्रु॥
एकही कार्यालय असे नाही!,
जेथे भ्रष्टाचार होत नाही ।
कोणा हवे तूप लोणी,
कोणा लागते नुसते दही॥
जनता आपली मुकी बिचारी,
सदैव असते ती लाचार ॥ध्रु॥१॥
भ्रष्टाचारात अनेकांची,
नांवे आज दिसतात।
तरी समाजात मोठ्या,
शेखीने ते मिरवत असतात॥
भ्रष्टाचार हा शिष्टाचार,
असाच त्यांचा असतो आचार॥ध्रु॥२॥
पहिला नंबर येण्यासाठी,
भ्रष्टाचाराचा सराव हवा।
पहिल्या नंबरच्या देशा जाऊन,
अभ्यास करून यायला हवा॥
तरच ! पूर्णं होईल पहिल्या नंबरचे,
स्वप्न तुमचे साकारहो, स्वप्न तुमचे साकार॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
१।४।२०११.