सीमोल्लंघन

मनात प्रश्नांचं काहूर...

कोशाबाहेरचे शब्द
संवादत असतील कां?
वक्षचौकटीच्या बाहेर भावना
लहरत असतील कां?
नवरसाच्या बाहेरच्या भावांना
अभिव्यक्ती असेल कां?
प्रकाश-छायेबाहेरची अवनी
अशीच घुमत असेल कां?
सत्यासत्याच्या बाहेरचं कांही
वेगळं अस्तित्व असेल कां?...

मला अज्ञात कुणी
हृदयातून अवतरला
मला हाती धरून पोहोचला
झटकन् निमिषाच्या मर्यादेबाहेर...

तिथून दिसत होता
एक विश्वबुडबुडा
तरंगता फिरता
त्याच्या पोटात दिसणारे
अगणित चमकते फुगे...

मी अवाक्...

मला हाती धरणारा तो
आता मला आवृत्त करून
सस्मित माझ्याकडे पाहाणारा...

माझी नजर पृच्छांकित...

त्याचे नीरव उत्तर
अनंताच्या आंतही अन्
बाहेरही असणारा मीच
तो अनंत...

आणि उमगली मला
प्रश्नांची व्यर्थता ॥