कुसुमाग्रज-एक काव्य

एक काव्य,

कवित्व पोरके करून,

काव्यात्म झाले ।

मराठी मातीत लावलेली

'चांदणवेल'

'पिंपळपानाच्या' 'समिधा',

'जाईच्या कुंजात' विशाखा नक्षत्रावर टाकून

'जीवनलहरीचा'

'दुधाळ किनारा' सोडून

'मेघदुता' सवे अध्यात्म झाले ।

हा 'एकाकी तारा' - 'अंतराळय़ात्री'

'वाटेवरल्या सावल्यांचा'

'विसावा' घेत-घेत

'प्रकाशाची दारे' ठोठावता झाला ।

'श्रावणातले'

'छंदोमयी' 'प्रवासपक्षी'

'संघर्षहीन बेटावरील'

'देवाच्या घरासमोरील'

'सारस्वताच्या झाडावर' बसलेत-

'मुक्तायन' करीत ।

बहरलेली 'वादळवेळ'

'फुलराणी' बनूनसुद्धा

'राजमुकूट' फेकून बसलीय

आक्रंदन करीत ।

'वैष्णव' आणि 'जान्हवीने' सुद्धा

सोडून दिलाय हट्ट

'जादूच्या हो़डीचा',

'सतारीचे बोल आणि इतर कथा'

ऐकण्याचा.

'छोटे आणि मोठे'

काही वृद्ध काही तरूण, सारेच

'आनंद' हरवून बसले

'मुख्यमंत्री' सुद्धा पायउतार झाले ।

हे 'रसयात्री' 'पांथेय' -

'दुसरा पेशवा' किंवा

'ययाती आणि देवयानी'

कालगती झाले अन्यथा-

त्यानीसुद्धा 'राजसंन्यास' घेऊन

हिमालयाची वाट धरली असती

पण....

आहे आणि नाहीच्या

'दिवाणी दाव्यात'

'कौंतेय' आणि 'ऑथल्लो' सारखे महंत

'विरामचिन्हे' मांडत बसले ।

आणि 'वैजयंती'-

'चंद्र जिथे उगवत नाही' तिथे

'मुक्त गद्यात'-

'विधात्याची' रुपरेषा ग्राह्य मानून

'दूरचे दिवे' पाहण्याचे स्वप्न जपले आहे ।

साऱ्याच 'अपाईंटमेंट'

'नटसम्राटांच्या' संपल्या तरी-

'वीज म्हणाली धरतीला'-

एक स्वगत संपले आहे.

विलास कांबळे