फॉरेन बॉडी -

अमेरिकेचे अध्यक्ष मि.बराक ओबामा यानी नुकतेच अमेरिकन नागरिकांनी भारतात स्वस्तात होतात म्हणून शस्त्रक्रिया करण्यासाठी भारतात न जाता अमेरिकेतच शस्त्रक्रिया करून घ्याव्यात असे आवाहन केले आहे.एके काळी भारतातून गरीब बिचारे भारतीय अमेरिकेत शस्त्रक्रिया अथवा इतरही उपचारासाठी जात असत आता गंगा उलटी वाहायला लागल्यामुळे ओबामा यांना पोटशूळ सुरू झालाय.भारतीय वा इतरही परदेशी नागरिकांची  सेवाक्षेत्रातील घुसखोरीही अशीच ओबामा याना डाचू लागली आहे (किंवा जनमताचा दबाव त्यांच्यावर येत असल्यामुळे ते तरी काय करणार ? तरी बरे अण्णा हजारे तेथे नाहीत.)त्यामुळे अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध घालून जे काम अमेरिकन अभियंते (वा कोणत्याही क्षेत्रातील अमेरिकन )करू शकतात त्यासाठी बिगर अमेरिकन लोकांना नोकरीवर ठेवण्यास बराच मोठा अडसर त्यांनी निर्माण केलाय.व्हिसा देण्यापासूनच अमेरिकेचे अडेलतट्टू धोरण अनुभवास यायला लागते.त्यांच्या फायद्याचे होते तेव्हा येईल त्याला अमेरिकेचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते इतकेच काय सुरवातीला तर पडेल ते काम करण्यासाठी आफ्रिकेतून कृष्णवर्णीयांना बळजबरीने आणण्यास आणि गुलाम म्हणून ज्यांची पिळवणूक करायला ज्यांनी कमी केले नाही त्याच अमेरिकेवर अशी पाळी यावी याला काय म्हणावे ?आश्चर्य म्हणजे त्या पकडून आणलेल्या स्थलांतरितापैकीच एकाचा वंशज आता अमेरिकेचा अध्यक्ष होऊन अमेरिकेची काळजी करत आहे.हा नियतीचा न्याय म्हणावा की आणखी काही ?

स्वत:ला महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेने इतरांना मानवी हक्काचे धडे शिकवत स्वत: मात्र सदसद्विवेक बुद्धी नेहमीच गहाण ठेवून केवळ आपल्या दादागिरीने आपल्या वागणुकीचे समर्थन केले.एकच गोष्ट अमेरिकेपासून शिकण्यासारखी म्हणजे तेथे शासनाच्या अशा वागणुकीवरही कोरडे ओढणारे विकोलीक्स किंवा इतरही अनेक आहेत ज्यामुळे स्वतंत्रता देवीचा पुतळा हा केवळ दिखावा नाही हे मान्य करावे लागते.

वैद्यकीय पर्यटनावर रॉबिन कुक यांनी लिहिलेली "फॉरेन बॉडी" ही कादंबरी अमेरिकेच्या अशाच एका भयानक दादागिरीवर प्रकाश टाकते. अमेरिकन वैद्यकीय महामंडलेही या वैद्यकीय पर्यटनाला कशा प्रकारे चूड लावण्याचा प्रयत्न करतात याचा कुक यानी वेध घेतला आहे."कोमा" या गाजलेल्या सुरवातीच्या पुस्तकापासून अमेरिकन वैद्यक व्यवसायातील दुष्प्रवृत्तीवर स्वत: नेत्रतज्ञ असणाऱ्या डॉ.कुक यांनी आपल्या ३४ कादंबऱ्यांतून प्रकाश टाकला आहे. आपल्या तीन आठवड्याच्या भारत दौऱ्यात आपल्या पुस्तकांविषयी बोलताना   आपण या विषयास हात का घातला हे सांगताना त्यानी  स्पष्ट केले की "अमेरिकेतीलच नव्हे तर प.युरोपातील रुग्णही पूर्वेकडील देशात शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात.मला एक गोष्ट कळत नाही की एकीकडे अमेरिका बाहेरच्या देशातील कर्मचारी आयात करते कारण हा देश सेवा उद्योजक आहे असे असताना दुसरीकडे मात्र बाहेरच्या देशाच्या सेवेसाठी अमेरिकनांना त्या देशात जावे लागते हा उलटा प्रवास कशामुळे?आमच्या आरोग्यसेवेतच काहीतरी उणाव असली पाहिजे. आणि ही गोष्ट अमेरिकन नागरिकांनाही समजली पाहिजे असे मला वाटले.भारतातील लोकांनाही यामुळे आपल्याकडे उच्च दर्जाची आरोग्य सेवा   उपलब्ध होते अशा आत्मसंतुष्टतेची भावना बाळगू लागले तर तेही चुकीचेच आहे.कारण भारतातील निम्न मध्यम वर्गास त्यामुळे काहीच फायदा होत नाही.भारतीय शासनासही अशा वैद्यकीय पर्यटनात रस असून त्यासाठी ज्या खास सवलती तिथे दिल्या जातात. त्यांचा लाभ कदाचित गरीब वर्गाला झाला असता तो आता होत नाही. " अशी अमेरिकन व भारतीय दोन्हीकडील रुग्ण सेवा  पद्धतीवर त्यानी टीका  केली आहे."फॉरेन बॉडी "कादंबरीचे सार खालीलप्रमाणे आहे.

भारतातील नव्या दिल्लीतील शानदार वस्तीतील सुसज्ज रुग्णालयात येणाऱ्या अमेरिकन रुग्भांच्या एकामागून एक घडून येणाऱ्या गूढ मृत्यूमागील रहस्य अमेरिकेतील एका वैद्यकीय विद्यार्थिनीस जेनिफर हर्नान्डेझ इला बुचकळ्यात टाकते आणि ते शोधून काढण्याच्या हेतूने ती भारतात येते त्याला कारण घडते तिच्याच आजीचा झालेला असाच गूढ मृत्यू.आपल्या लॉस एन्जेलिसमधील रुग्णालयातील कामातून मधल्या विश्रांतीच्या वेळात दूरदर्शनवरील सी. एन. एन. वाहिनीवर ती अमेरिकेसारख्या प्रगत देशातील नागरिक भारतासारख्या अप्रगत देशात शस्त्रक्रिया करायला जातात अशी वैद्यकीय पर्यटनाविषयी बातमी व त्यात आपल्या लाडक्या आजीचा झालेला उल्लेख ऐकते.आणि तिचे हृदयाचे ठोकेच जणू काही काळ बंद पडतात.तिची आजी मारिआ सुअरेझ हर्नान्डेझ नवी दिल्लीतील क्वीन व्हिक्टोरिया या रुग्णालयात नितंबावरील शस्तक्रियेनंतर एका दिवसाने मरण पावली असे सी.एन.एन.च्या  वार्ताहराच्या तोंडून ती ऐकते. जेनिफर व तिच्या भावाला याच आजीने अगदी बाळपणापासून वाढवले होते.त्यामुळे ती जेनिफरची अतिशय प्रिय व्यक्ती होती त्यामुळे ती अशी आपल्याला न कळवता भारतात शस्त्रक्रिया करायला गेली ही बातमीच तिच्या दृष्टीने धक्कादायक होती.पण तरीही आपल्या कष्टाळू पण आरोग्यविमा संरक्षण नसलेल्या आजीला दुसरा पर्यायच नव्हता हेही तिच्या लक्षात आले.

असे असले तरी शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्यावर मरण पावण्यासारखी तिची प्रकृती नव्हती हे जेनिफर स्वत: एक वैद्यकीय पदवीधर असल्याने जाणत होती.त्यामुळे या गोष्टीचा छडा लावायचाच या हेतूने लगेच रजा घेऊन ती भारतात येते.रुग्णालयात प्रथम तिला चांगली वागणूक देऊन तिच्या आजीचा मृतदेह ताब्यात घेऊन   शक्य तितके लवकर दफन किंवा दहन करावे असे तिला गोडीगुलाबीने सांगण्यात येते.ख्रिश्चन असूनही दहनाचा आग्रह धरण्याचा उद्देश मृत शरीराचा नंतर मागमूसही राहू नये हा असतो.त्याच सुमारास असे बरेच मृत्यू या दोन आठवड्यातच त्या रुग्णालयात झाल्याचे जेनिफरला कळते.आणि दहन वा दफन करण्यास जेवढा विलंब लावता येईल तेवढा लावण्याचे ती ठरवते,आणि न्यूयॉर्क शहरातील वैद्यकीय परीक्षक (अमेरिकेत मृत शरीर शस्त्रक्रिया करून तपासणाऱ्यांना Medical Examiner ही संज्ञा आहे.)व तिच्यावर मातृतुल्य प्रेम करणारी डॉ.लॉरी मोन्टगोमरीशी संपर्क साधते.लॉरी आपला नवरा डॉ.जॅक स्टेपल्टन याला घेऊन तडक दिल्ली गाठते.तेथे गेल्यावर शस्त्रक्रिया व रुग्णालयातील एकूण व्यवस्था पाहून अशा परिस्थितीत जेनिफरच्या आजीसारख्या कुठल्याही प्रकारची पूर्वविकृती नसणाऱ्या स्त्रीला मरण येणे शक्यच नाही असा निष्कर्ष ते काढतात.

जेनिफरला तिच्याचसारखी तेथे आलेली दुसरी अमेरिकन स्त्री भेटते व तीही तिच्या नवऱ्याबरोबर त्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेली असते व तिचाही नवरा शस्त्रक्रियेनंतर मरतो व त्याचेही कारण तिला सांगण्यात आले नव्हते. रात्री ती नवऱ्याची प्रकृती पाहून व ती ठीक आहे हे पाहून हॉटेलमध्ये जाते व पहाटे तिला त्याच्या मरणाची बातमी प्रथम दूरदर्शनच्या सी.एन.एन.वाहिनीवरून कळते.

जेनिफरप्रमाणेच तिलाही नवऱ्याचे दहनच करण्याचा आग्रह धरण्यात आलेला असतो.जेनिफर तिची गाठ घेते व नवऱ्याचे शव ताब्यात घेण्यास शक्य तेवढा विलंब करण्यास सांगते कारण लॉरी व स्टेपल्टनच्या मदतीने या प्रकरणाचा छडा आपण लावू असा तिला विश्वास वाटतो.

त्याच काळात त्या रुग्णालयात काम करणारी वीणा चंद्रन या परिचारिकेला शोधून जेनिफर तिला बोलते करण्याचा प्रयत्न  करते कारण ही परिचारिका व तिची मैत्रीण असणारी आणखी एक परिचारिका या दोघींचा वावर दोन्ही रुग्णांच्या खोल्यांतून झालेला असतो.त्या भेटीतून बाहेर आलेले सत्य भयानकच असते.

अमेरिकेतील रुग्णालयात जाणारे रुग्ण भारत वा पूर्वेकडे देशात जत असल्यामुळे ज्या रुग्णालयांचे नुकसान होत होते अशा रूग्णालयांना त्यांचे नुकसान होणार नाही अशी मोठ्या रकमेच्या मोबदल्यात हमी देणारा अमेरिकन कॅल मोर्गन भारतात येऊन आंतर्राष्ट्रीय परिचारिका अकादमी (International Nurses academy) स्थापन करतो व तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांना परदेशात म्ह.अमेरिकेत पाठवण्यात येईल अशी लालूच दाखवतो.त्यांच्यापैकी वीणा व तिची मैत्रीण या काही घरगुती अडचणीत सापडलेल्या अशा पाहून प्रशिक्षणानंतर त्यांची  त्या आपत्तीतून सुटका करण्याच्या बोलीवर तो त्यांना आपल्या कह्यात घेतो व एक कामगिरी त्यांच्यावर सोपवतो. ही कामगिरी म्हणजे अमेरिकेतील जे रुग्ण क्वीन व्हिक्टोरियात शस्त्रक्रियेत दाखल होतील त्यांच्यावर शस्तक्रिया झाल्यावर त्यांना संपवणे.त्यासाठी या रुग्णांना Saccinylcholine चे इंजेक्शन देण्यात येते ज्यामुळे रोगी नैसर्गिक रीतीने मरण पावला असे दाखवता येते.(डॉ.रॉबिन कुक यांच्या वैद्यकीय ज्ञानावर या बाबतीत विश्वास ठेवायला हवा )अशा प्रकारे मरण पावलेल्या रोग्याची माहिती लगेच सी.एन.एन.वर झळकत असते कारण मोर्गनने तेथेही आपले जाल पसरलेले असते.)अशा अपप्रचारामुळे भारतात येणाऱ्या रुग्णांवर आपोआपच परिणाम होईल व हळू हळू तो ओघ थांबेल हा मोर्गनचा डाव असतो.

वीणा व तिच्या मैत्रिणीवर  इंजेक्शन कामगिरी सोपवण्यात येते.तिची मैत्रीण अगदी "हुरळली मेंढी--" असल्याने आपली कामगिरी तडफेने पार पाडते पण वीणास मात्र सदसद्विवेक बुद्धी चैन पडू देत नाही आणि संधी साधून ती हे जेनिफरच्या  कानावर घालते.त्यानंतर जेनिफर ,लॉरी व स्टेपलटन शिवाय जेनिफरचा प्रियकरही नंतर त्याना येऊन मिळतो व सगळे मिळून या भयंकर कारस्थानाचा कसा भंडाफोड करतात हे मुळापासूनच वाचण्यासारखे आहे.