कसे आभाळ आले होते भरून
काळ्याकुट्ट ढगांनी गेले होते ओथंबून
टपोरे दोन चार थेंब कोसळले
नि एकदम कसे गेले थांबून
दूध देणार्या गायीला कोणी नेले ओढून
कोणी तरी चाबूक मारावा तसे ढग कोठे गेले पळून ..?
माझ्या तहानलेल्या शेतीला हवा आहे पाउस
दोन -चार थेंबात कशी गेली होती आनंदून
कशी नाचू लागली ...
नि कसा मस्त मृदगंध झिरपला तिच्या रोमारोमातून
क्षणभर पाखरे ही गप्प झाली
चिप्प झाली झाडा-पानातुन
मग अचानक कसा गेला हरवून ...?
कसे कासावीस झालेय माझे शेत,
माझी विहीर ,
माझे गाव ...!!
कशी कोरड पडली घशाला ..!
कसा सुकून गेलाय चेहरा ,शरीर
नि हवालदिल होऊन गेलीय
जमीन गेलीय उन्हाने करपून
येउदेणारे पाउस देवा नकोरे अंत बघू ...
गाईच्या डोळ्यातले पाणी नि चार्यासाठी वणवण
काळ्या जमिनीतून येउदे ते हिरवे कौतुक
ओथंबून आलेले ढग ,कशास नेले तू पळवून
थोडेसे थांबायचे होतेस ना ,,?
थोडीशी बरसात
एखादी सर
नसते का झाले माझे गाव
ही नदी
ह्या विहिरी
नि माझे शेत धन्य ..!!
तुझ्या ओंजळीतून द्यायचे अर्ध्य थेंबाचे
मग ह्या काळ्या मातीची
उजवली असती कूस
उजवली असतीना तिची कूस ... ???