अंगूर मलाई

  • १० ते १२ कप दूध
  • अर्धा कप लिंबू रस
  • अर्धा कप पाणी
  • अडीच कप साखर
  • ६ कप पाणी
  • १ ते २ चमचे मैदा
  • कापलेले बदाम, पिस्ते सजावटीपुरते
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • चिमूटभर केशर
१ तास
४ ते ५ माणसे
प्रथम जाड बुडाच्या पातेल्यामध्ये ६ ते ७ कप दूध उकळत ठेवावे. दूध पातेल्याला खाली चिकटणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आच मध्यम असू द्यावी. दुधाला उकळी आली की आच मंद करावी. लिंबू रस पाण्यामध्ये एकत्रित करून हळूहळू उकळी आलेल्या दूधात घालावे. दूध सतत ढवळावे. थोडेसे ढवळल्यावर पनीर व पाणी वेगवेगळे होताना दिसू लागेल. आच बंद करावी. थोडासा वेळ दूध ढवळावे. एका चाळणीत एक पातळ कापड घालून हे पनीर गाळून घ्यावे. (गाळून शिल्लक राहिलेले पाणी पोळीची  कणिक मळायला वापरले जाऊ शकते.) या गाळलेल्या पनीर वर गार पाणी सोडावे. गार पाणी सोडल्याने पनीर घट्ट होत नाही. अंगूर बनवण्यासाठी अत्यंत मऊ पनीर ची गरज असते. भाजीसाठीचे  पनीर थोडे घट्ट असते.  थोडावेळ हे पनीर टांगून ठेवावे. त्यातील पाणी गाळले गेले पाहिजे. मग हे पनीर परातीमध्ये घ्यावे. तळहाताने थोडे थोडे पनीर मळून घ्यावे. पनीर मध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. या पनीर मध्ये १ चमचा मैदा घालून त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. ३/४ कप साखर व त्यात ५ कप पाणी घालावे. या पाकाला उकळी आली की पनीर चे गोळे त्यात घालून झाकण लावून ५ मिनिटे शिजवावेत. शिजले की या गोळ्यांचा आकार दुप्पट होतो. हा साखरेचा पाक दाट होता कामा नये. प्रत्येक वेळेला गोळे शिजवताना थोडे पाणी वाढवावे. पाव कप साखर व १ कप पाणी एकत्र करून  कोमट करून घ्यावे. हे पाणी आचेवर ठेवू नये. शिजलेले पनीर या कोमट पाण्यात काढावेत. हे सर्व होताना उरलेले दूध आटवत ठेवावे. ६  कप दूध आटवत ठेवले असेल तर त्याचे ३  कप होईपर्यंत आटवावे. उरलेली दीड कप साखर या दूधात घालावी. वेलची व केशर घालावे. कोमट पाण्यातले अंगूर ५ ते ७ मिनिटांनी हातामध्ये हळुवार दाबून घ्यावेत व  आटवलेल्या दूधामध्ये सोडावेत. अंगूर मलाई गार झाली की बदाम व पिस्ते घालून serve करावी.

अशाच इतर पाककृती पाहण्यासाठी माझ्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या.