लक्षात राहिलेले शिक्षक!

पानसरे बाई! गरवारे शाळेत आम्हाला इयत्ता ८ वी ला  इंग्रजी शिकवायला होत्या. मध्यम बांधा, वर्ण सावळा, स्मित हास्य, लांबसडक केसाचा एक शेपटा घालायच्या. वर्गावर आल्या आणि जर का नवीन धडा शिकवायचा असेल तर तो खणखणीत व स्पष्ट उच्चारांसह वाचायच्या. नंतर लगेच त्या धड्याखालच्या प्रश्नोत्तरांना सुरवात. प्रश्न वाचणार व आम्हाला उत्तर शोधायला सांगणार. ज्यांना उत्तर येत असे त्या त्या मुले/मुली सांगत असत. जर उत्तरे चुकली तर सांगायच्या की याचे उत्तर तुम्हाला अमुक अमुक परिच्छेदांमध्ये सापडेल. नंतर स्वतः त्या प्रश्नाचे उत्तर सांगणार. अशा प्रकारे सर्व प्रश्न उत्तरे तोंडी सोडवून घेत असत. त्यात गाळलेल्या जागा भरा, चूक की बरोबर अश्या धड्याखालचा सर्व एक्झरसाईज तोंडी सोडवून घ्यायच्या. डस्टरने सर्व फळा पुसून मग सुवाच्य अक्षरात प्रत्येक प्रश्न लिहून त्याखाली त्याचे उत्तर असे सविस्तर लिहिणार. मग आम्ही आमच्या वहीत ती सर्व उतरवून घ्यायचो.

इयत्ता ९ वी ला आम्हाला केळकर बाई होत्या जीवशास्त्र शिकवायला. बुटक्या व थोड्या जाड. वर्णाने गोऱ्या गोऱ्या पान!! चेहऱ्यावर नेहमी लालसर छटा. कुंकू पण लालचुटुक व मोठे लावणार. कानातले पण अगदी उठून दिसणारे घालणार. कंठीचे मंगळसूत्र तर त्यांना खूपच शोभून दिसायचे. त्यांचे यजमान रसायनशास्त्र शिकवायचे. दोघेही शिक्षक! त्या दोघांना आम्ही राजकपूर नर्गिस म्हणायचो. जीवशास्त्र त्या आकृतीच्या आधाराने शिकवायच्या, त्यामुळे विषय अगदी पक्का डोक्यात बसायचा. वर्गावर आल्या की डस्टरने फळा पुसून धड्यामधला जो भाग शिकवायचा आहे त्याची आकृती काढणार. मेंदू शिकवायचा असेल तर मेंदूची आकृती. हृदय शिकवायचे असेल तर हृदय काढणार. आकृतीला नावे देणार आणि शिकवायला सुरवात! हृदय म्हणले की नीला, रोहिणी, शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, हृदयाला असणाऱ्या झडपा. प्रत्येकाचे काय कार्य आहे हे व्यवस्थित समजावून सांगायच्या. धड्याखालची प्रश्नोत्तरे आम्हाला सोडवायला सांगायच्या. आकृतीच्या आधारे विषय शिकवल्यामुळे प्रश्नोत्तरे आमची आम्हाला सोडवायला सोपे जात असे.

९ वीला हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या रमा जोशी बाई पण अशाच लक्षात राहिल्या आहेत. बारीक चण व उंच. गोऱ्यापान! जो धडा शिकवायचा असेल त्यातला कोणताही एखादा परिच्छेद वाचून दाखवणार. आवाज खणखणीत! त्यातले अवघड शब्दांचे अर्ध सांगणार. शिवाय फळ्यावर पण ते शब्द लिहिणार. कठीण शब्द जास्तीत जास्त समजण्यासाठी हिंदीतून अधिक स्पष्टीकरण! स्पष्टीकरण देताना त्या शब्दाच्या अनुषंगाने येणारी इतर वाक्ये सांगणार. तो शब्द वापरून एखादे वेगळे वाक्य आमच्याकडून वदवून घेणार!

घाऱ्या गोऱ्या जमेनिस बाई आम्हाला इयत्ता १० वीला इंग्रजी शिकवायला होत्या. इंग्रजी उत्तम शिकवायच्या. त्या नेहमी पांढरी साडी नेसायच्या. गोल अंबाडा, निळे डोळे, गोरा वर्ण. परक्या देशातील एखादी गोरी बाई जशी दिसेल तशा दिसायच्या. त्या वर्गावर आल्या की वर्ग एकदम चिडीचूप! चेहरा थोडासा गंभीर व रागीट त्यामुळे कदाचित आम्हाला त्यांची भीती वाटत असावी. पण त्यांच्याकडे बघून हसले तर लगेच त्याही हासायच्या!

गरवारे शाळेत ११ वीला ज्युनियर कॉलेजला शिकवणाऱ्या एक शिक्षिका म्हणजे बोरगावकर बाई! सडसडीत बांधा. उंच, सावळ्या, लांबसडक केसांचा शेपटा घालायच्या. मरून रंगाचे कुंकू लावायच्या. कानात नेहमी रिंगा. नेहमी दोन्ही खांद्यावरून पदर. पदरही मोठा असायचा. साडी नेहमी पारदर्शक. मला तर या बाई खूपच आवडायच्या. त्यांच्या साड्या अजूनही माझ्या लक्षात आहेत. मरून रंग, मोरपंखी, नारिंगी रंग, या रंगांच्या साड्या. मधूनच एखादवेळेला फिकट आकाशी रंगाची असायची! हातात नेहमी २-३ खडू ठेवणार. त्या आम्हाला Organization of Commerce ला होत्या. जो धडा शिकवणार असतील तो आम्हाला वाचून यायला सांगायच्या. धड्यामधले मुद्दे फळ्यावर लिहिणार आणि मग एकेकाचे स्पष्टीकरण. प्रत्येक मुद्यांचे स्पष्टीकरण त्यांना आमच्याकडून अपेक्षित असायचे. कोणीच काहीच सांगितले नाही तर खूप रागवायच्या. सगळा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. त्यांची अपेक्षा अशी की आम्ही काहीतरी सांगावे, बोलावे, सगळे येणार नाहीच माहीत आहे, पण एखादी ओळ, एखादे अक्षर तरी सांगा! आमच्याकडून थोडा जरी रिस्पॉन्स मिळाला तरी एकदम खूश व्हायच्या. आनंद लगेच चेहऱ्यावर दिसायचा. मग त्या धड्याच्या notes सविस्तर द्यायच्या.

Accounts ला मी क्लासला जायचे. सर्वच क्लास लावत असत. S.G.Joshi चा क्लास त्यावेळेला खूप प्रसिद्ध होता. कॉलेज घरापासून खूप लांब होते. बसने जावे लागायचे म्हणून मग रोजच्या रोज accounts चा क्लासला जाणे जमत नव्हते. माझ्या मामेभावाच्या ओळखीचे एक सर होते. बापट सर! शनवारात राहायचे. त्यांच्या क्लासला मी शनिवार रविवार जायचे. खरे तर शनिवार रविवार क्लास ते घेत नसत, पण माझ्याकरता त्यांनी घ्यायला सुरवात केली. सुरवातीला मी एकटीच होते. नंतर माझ्या ओळखीने १५-२० मुली झाल्या. क्लासला सतरंजीवर आम्ही बसायचो. गोलाकार बसायचो. बापट सरांनी accounts चे पुस्तक हातात घेतल्याचे मला आठवत नाही. सर्व तोंडी शिकवायचे. आधी प्रॉब्लेम सांगायचे व आम्ही तो वहीत उतरवून घ्यायचो. मग त्याचे पोस्टिंग सांगणार. मग दुसरा प्रॉब्लेम सांगणार. सर्व प्रकारची गणिते अशीच सोडवून घेत असत. नंतर फक्त प्रॉब्लेम्स  सांगून आम्हाला  ते सोडवायला सांगायचे. वेळही सांगणार. अर्ध्या तासात सोडवून झाला पाहिजे. मग जिचा प्रॉब्लेम टॅली होईल तिची वही हातात धरून प्रॉब्लेम कसा सोडवला आहे ते सांगून प्रत्येकजण आपला प्रॉब्लेम  कुठे बरोबर कुठे चूक हे पाहत असे. मला accounts मधले amalgamation खूप आवडायचे. डेबिट क्रेडिट पोस्टिंग बरोबर करा. adjustments ची double entry करा सांगायचे. journal entries लिहिताना narration लिहायला विसरू नका, त्यालाही मार्क असतात सांगायचे. प्रॉब्लेम टॅली करताना आमची खूप स्पर्धा चालायची. कारण accounts मध्ये balance sheet tally झाली की तो बरोबर. टॅली होत नसेल तर कुठेतरी गणित चुकते आहे. मग एकेक पायऱ्या  पडताळून पाहायच्या. त्यावेळेला कॅलक्युलेटर होते पण ते वापरायला बंदी असायची. सर्व बेरजा म्हणजे profit and loss accounts, balance sheet तोंडी कराव्या लागायच्या, त्यासुद्धा लाखांच्या व कोटींच्या आकड्यात! प्रॉब्लेम टॅली  झाला की आम्हाला खूप आनंद व्हायचा. बापट सरांनी फळ्यावर गणिते कधीच सोडवून दाखवली नाहीत की हातात पुस्तक कधी  घेतले नाही!!

गरवारे कॉलेजला मराठी शिकवायला आम्हाला लेखक श्री द. मा. मिरासदार होते. त्यांनी आम्हाला मराठी शिकवलेले आठवत नाही कारण सतत हशा पिकायचा!! हा मराठीचा तास आहे की हासण्याचा!! त्यांच्या तासाला इतर वर्गातली मुले आमच्या वर्गात येऊन बसायची. एका बाकावर चार चार मुले दाटीवाटीने बसायची. पूर्ण वर्ग गच्च भरलेला!! शेवटी काही मुलांना परत जावे लागायचे. नंतर सर शिपायाला सांगायचे आता मुलांना आत सोडू नकोस, दार लावून घे. तसेही गरवारे कॉलेजला वर्ग चालू असताना दारे लावली जायची. त्यामुळे प्रयेक तासानंतर मधल्या ५ मिनिटांत वर्गातून मुले बाहेर ये जा करायची. कुणाला तो तास बुडवायचा असेल तर तो लगेचच बाहेर पडायचा.

माझे आईबाबा घरी क्लास घेत असत पण मोठ्या प्रमाणावर नाही. एका वेळी जास्तीत जास्त १०-१२ मुले/मुली. आम्ही दोघी बहिणी पण त्या मुलांबरोबर अभ्यासाला बसायचो. त्यावेळी आमच्या घरी  सतरंजी अंथरून क्लास घेतले जायचे. प्रत्येकाने पाटी आणावी असा आग्रह असायचा बाबांचा! बीजगणित शिकवताना बाबा १-२ गणिते पाटीवर सोडवून समजावून सांगायचे. सगळ्यांना सांगायचे नीट लक्ष द्या, अडले तर लगेचच विचारा. मग आमची आम्ही गणिते सोडवायचो. गणिते सोडवताना कुणाला आले नाही तर जिचे/ज्याचे उत्तर बरोबर असेल त्याला/तिला बाबा सांगायचे की तू आता पाटीवर सगळ्यांना गणित सोडवून दाखव व समजावूनही सांग. खूप कठीण गणिते बाबा स्वतः सोडवून समजावून सांगायचे. भूमिती मधली गणितेही  पाटीवर आकृती काढून शिकवायचे.

 

आमच्या घरी दर शनिवारी ग्रामरचा तास असायचा. त्यात स्पेलिंग टेस्ट असायची. तीनही काळातील भूत, वर्तमान, भविष्य टेबल्स घोकून घ्यायचे बाबा सर्वांकडून. त्याकरता बाबांनी एक वही केली होती. त्यात सर्व क्रियापदे असायची. मग प्रत्येकाकडून एकेक क्रियापद घोकून घ्यायचे.  २०-२५ मार्कांच्या छोट्या टेस्टही असायच्या. टेस्ट पेपरच्या प्रती काढताना बाबा कार्बन कागद वापरायचे. स्पेलिंग पाठ करताना पण प्रत्येक स्पेलिंग पाटीभर लिहून काढायचो व शिवाय मोठ्याने घोकायचो. शब्दाच्या उच्चारांप्रमाणे शब्द तोडून स्पेलिंग पाठ करायला बाबांनी शिकवले.