चाल

जगी म्हणतात, सर्वात डौलदार राजहंसाची चाल

तर सर्वात दमदार गजराजाची चाल

आकाशात पाय न वाजविता चालणाऱ्या मधुचंद्राची

असते रंगिली चाल,

काय असते दिमाखदार, राष्ट्राध्यक्षाच्या आसनाकडे

जाणाऱ्याची चाल

पण या सर्व चालींपुढे  मला लुभावते

एक चाल, जी अडचणींच्या डोंगरांना

पार करण्यासाठी पुन्हा पुन्हा कोसळून

फिरून जिद्दीने उभे राहिलेल्या

सामान्य माणसाची चाल

ज्यांना सगळच मिळालेल असत

त्यांच्या जगण्याचं काय हो कौतुक?

पण जे न मिळालेल्या दानाला

उपेक्षून ताठ जगण्यासाठी

अनंत मरणे झेलतात,

त्यांच्या त्या ठेचकाळूनही

पुनश्च सावरणाऱ्या चालीला

माझे लाख लाख प्रणाम!

                -  डॉ. अनुराधा कुलकर्णी