ओली सुकी !

घरची मंडळी एकदा सहलीला गेली , डोंगर दऱ्याखोऱ्या पाहून हरखून गेली.

धबधब्याखाली हल्लागुल्ला केला , बरोबरच्या खाण्यावर ताव मरून झाला   १

वाटेवरची रानफुले खुणावत होती , समोरची दाट झाडी साद देत होती

बाजूचा छोटा झरा बोलावत होता , जाता जाता उगाच पाणी अंगावर टाकत होता  २

खरे तर सखे ... संगतीने फिरायचे होते , रानफूल तुझ्या केसात माळायचे होते

समोरच्या त्या दाट झाडीत हरवून जायचे होते , खळाळत्या झऱ्यात पाय सोडून बसायचे होते  ३

हिरवळीवरून चालतांना घसरायचे होते , हात घट्ट धरून तुला सावरायचे होते

डोंगरकड्यावर चढून जायचे होते , टोकावर बसून दरीत डोकवायचे होते  ४

पण.... यापैकी सखे मी काहीच केले नाही, चुळबुळ  तुझीसुद्धा नजरेतून सुटली नाही

बहुतेकवेळा आपले हे असेच होत असते . मनामध्ये असते ते कधीच होत नसते  ५

गच्च ओला होऊनही मी कोरडाच राहिलो , धुवांधार पावसात बिस्लेरी पीत राहिलो  !

                                                                           धुवांधार पावसात बिस्लेरी पीत राहिलो  !!