प्रिय आई बाबास

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी

नजरेत नेहमी नवी दिशा असावी

हिच शिकवण तुमच्याकडून आम्हा मिळाली

क्षितिजाकडे भरारीची क्षमता तुम्हीच तर दिली

बळकट पंखांनी आकाशाला गवसणी घालताना

आठवेल तुमचा धरलेला हात पहिले पाऊल टाकताना

सांगता अडचणींतून वाट काढतच गाठावा लागतो हिमालय

आम्हा कळे अपयशाने कोलमडू नका हाच तुमचा आशय

आम्हाला माहित आहे खरी झेप खूप दूर आहे

आमच्या निश्चयाची परीक्षा अजून बाकी आहे

पण तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करताना

घसरणार नाही आमचा पाय चुकूनही चालताना

आज सांगू इच्छितो आम्ही तुम्हाला काही

तुमच्या विश्वासाला तडा कधीच जाणार नाही

तुमच्या कष्टांची जाणीव आम्हाला सदैव राहिल

तुमची मुले म्हणून हे जग आमच्याकडे कौतुकाने पाहिल