अजून त्याची नाही चाहूल..

अजून त्याची नाही चाहूल..

रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततची ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल

नको नको त्या कोकिळताना
वायस का ना बोले शकुना
सुकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल

दर्पणी बघता तूचि तूच रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल

श्वासागणिक स्फुरण तुझे रे
श्वास न आता माझे उरले
मीपण संपून तूचि केवळ
आता तू चि तू चि केवळ
आता केवळ त्याची चाहूल..