कोणते विषय आवश्यक ?

  काही वर्षांपूर्वीचा काळ. 

  घराजवळीलच एक चार ते पाच वर्षांचा र्मुलगा त्याच्या नातेवाईकांसह आमच्याकडे आला होता. मी संगणकावर काम करीत होतो आणि कामाशी तद्रुप झालो होतो. हा मुलगा मांजराच्या पावलांनी केव्हा जवळ येऊन उभा राहिला, हे कळलेच नाही.  कोणी मोठी माणसे काम करीत असली की, उत्सुकता असणारी पोरं जवळ येऊन बारकाईने निरीक्षण सुरु करतात. अजून षड्रिपूंनी त्यांच्याजवळ फेर धरायला सुरुवात केलेली नसल्याने त्यांचे निरीक्षण निरागस असते.  काळ्या कोऱ्या पाटीवर उमटणाऱ्या पांढऱ्या अक्षराइतक्या स्पष्ट नोंदी त्यांच्या मनावर उमटत जातात.  
   तो माझे काम पाहतोय, हे लक्षात आलं आणि मी क्षणभरासाठी माझ्या कामातून बाहेर आलो. हसून त्याच्याकडे पाहिलं.  त्याच्याकडून काही प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. मी पुन्हा पटलावर डोळे रोखणार एवढ्यात त्याने विचारलं, 
  "हे विंडोज ९८ आहे की एक्स पी?"
  आधी धक्का बसणे, मग कौतुक वाटणे आणि सरतेशेवटी भयचकित होणे अशा स्थितीतून माझं मन अवघ्या अर्ध्या मिनिटात गेल्याचं माझ्या लक्षात आलं. उत्तर द्यावं की आधी त्याचा बायोडेटा विचारावा, या विचारात माझं पुढचं अर्धं मिनिट गेलं. 
   तो म्हणाला, "आमच्याकडे आता घेणार आहेत एक्स पी". 
   मी आणखी काही सांगितलं असतं तर माझ्या ज्ञानात भर पडली असती, असे वाटते.
   हा मुलगा पहिलीतही गेला नव्हता. गणित, इतिहास, भूगोल, भाषा, नागरिकशास्त्र या विषयांची तोंडओळखही नव्हती. सर्वसामान्यपणे हे विषय आमच्या पिढीत प्राथमिक मानले गेले. संगणक हा खूप नंतरचा विषय मानला गेला. विज्ञानाची पुढची पायरी म्हणता म्हणता कालांतराने स्वतंत्रपणे अभ्यसनीय असा विषय म्हणून पुढे आला. वरील सर्व विषय आताच्याही पिढ्यांमध्ये प्राथमिकच मानले जात असावेत. अनेक ठिकाणी संगणक शाळांमधून शिकविला जात आहे, तरीही हेच विषय आधी आणि संगणक नंतर असाच शिक्षणाचा क्रम आहे, असावा.  
  विचारशृंखला सुरु झाली, 'संगणकाची माहिती असण्याबद्दल दुमत नाही. तो नव्या जगाचा सांगाती असल्याने त्याची माहिती हवीच. 
पण आपण कुठल्या राज्यात राहतो, शिवाजी कोण होता,  एक ते पन्नास आकडे म्हणजे काय, नखे का कापावीत या मूलभूत गोष्टी ज्याला अद्याप पक्क्या  माहिती नाहीत त्याला संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान असणे आवश्यक आहे का ? संगणक आधी शिकला पाहिजे आणि बाकीचे नंतर; अशी स्थिती नव्या पिढीबाबत तयार झालेली आहे का ? बाकीचे विषय नाही शिकले तर या मुलांची जडणघडण कशी होईल ?' 

असंख्य प्रश्न.

काळ किती बदलला आहे !