एलियन्स ------लघुकथा------जयनीत दीक्षित

स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!!
आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ताऱ्याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी चा शोध लागला आहे.
ह्या ग्रहा वर अनेक जीवजंतू सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या एक प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विविध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत. ह्या भेदांच्या आणखी अनेक नवीन शब्दांच्या जे आपल्या करिता नवीन आहेत त्यांच्या व्याख्या सोबत पाठवत आहोत.
ह्या प्रजातीच्या सामाजिक प्रणालीत एक छोटा समूह महत्त्वपूर्ण आहे ज्याला कुटुंब असे म्हणतात. हे कुटुंब एक नर आणि एक मादी आणि त्यांची अपत्ये ह्यांचे मिळून बनलेले असते. ह्या प्रजातीत नर आणि मादीला एका विशिष्ट वया नंतर एकत्र राहण्याची परवानगी दिली जाते त्याला लग्न असे म्हणतात. हे लग्न वेग वेगळ्या देश, संस्कृती, धर्मा प्रमाणे वेगवेगळ्या रीती रिवाजांनी होत असते. लग्ना नंतर नर आणि मादी अपत्यांना जन्म देऊ शकतात.
हे एलियन्स त्यांच्यातील समानते पेक्षा त्यांच्यातील भेदां वरच खूप प्रेम करतात, आणि ते नष्ट करण्या पेक्षा त्याचा अभिमान बाळगून त्यांचे रक्षण करण्या करता धडपडत असतात म्हणूनच ह्यांचे प्रेम नेहमीच हिंसेच रूप धारण करतं. हा हिंसा हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही ह्याचा अर्थ प्रजातीतल्या एकाने दुसऱ्या ला इजा करणे वा पूर्णपणे नष्ट करणे.
हे आपल्या वर्णा वर फार प्रेम करतात म्हणून दुसऱ्या वर्णाच्या लोकांना नीच समजतात ह्या मुळे ह्याच्या सतत लढाया होत राहतात. हे आपल्या देशावर प्रेम करतात म्हणून त्याचे वर्चस्व वाढवण्यासाठी लढतात. आपआपल्या धर्म अन भाषा ह्यांना ते सर्वश्रेष्ठ समजतात आणि त्याच्या अस्मिते साठी सतत लढत असतात. ह्यांच्या मध्ये संपत्ती साठी ही नेहमीच संघर्ष होत असतो. हा संपत्ती हा शब्द आपल्या साठी नवीन आहे संपत्ती म्हणजे ह्यांच्या ग्रहावरची संसाधने. ह्याचे ह्यांनी वाटप करून टाकले आहे त्यालाच हे संपत्ती म्हणतात.हे आपल्या संपत्ती वर प्रेम तर करतातच पण दुसऱ्याच्या संपत्ती वर सुद्धा तितकेच प्रेम करतात, मग त्याला प्राप्त करण्या साठी लढतात. येथील संसाधना वर फार थोड्या लोकांचा अधिकार आहे त्याच्या बळाने ते बाकीच्यां वर ज्यांच्या जवळ संसाधनांचा अभाव आहे त्यांच्या वर नियंत्रण करतात. आणि तरीही हे प्रेम समानता बंधुता हे शब्द नेहमी वापरत असतात ज्याला आम्हीच काय हे लोक ही गंभीरतेने घेत नाही.
आजवर च्या आमच्या संशोधना वरून आम्ही ह्या निष्कर्षा वर पोहचलो आहोत की ह्या प्रजाती शी संबंध ठेवणे आपल्याला हानिकारक आहे. जर ह्यांच्या हिंसा, द्वेष, सत्ता,संपत्ती, अधिकार, भेदभाव इत्यादी विषाणूचे संक्रमण आपल्या प्रजातीत झाल्यास ते आपल्या अस्तित्वा साठी फार घातक ठरेल.
आम्ही ह्यांच्या पासून सुरक्षित अंतर ठेवून आहोत, परत फिरण्याच्या अनुमती ची वाट बघत आहोत.