फेणी

  • तांदुळ १ वाटी
  • खसखस २-३ चिमूट
  • मीठ चवीपुरते
४५ मिनिटे
२ जण

तांदूळ पाण्यात ३ दिवस भिजत घाला. सकाळ संध्याकाळ पाणी बदलावे. तिसऱ्या किंवा चोथ्या दिवशी भिजवलेले तांदूळ मिक्सर ग्राइंडर वर बारीक करा. तांदूळ बारीक होण्याकरता पाणी लागेल तितकेच घालून तांदूळ वाटून घ्या. नंतर एका पातेल्यात बारीक गंधासारखे वाटलेले तांदूळ घाला व थोडे पाणी घाला. हे मिश्रण पातळ बासुंदीइतके दाट हवे.  नंतर त्यामध्ये खसखस व चवीपुरते मीठ घाला.

खूप कमी आचेवर  कुकरामध्ये पाणी तापवत ठेवा. नंतर सर्व फेण्या, फेण्या करण्याच्या गोलाकार पत्र्यांवर पसरवा. हे मिश्रण पातळ पसरले गेले पाहिजे. प्रत्येक गोलाकार पत्रा स्टँडमध्ये घालून तो स्टँड कुकरामध्ये ठेवा. त्यावर कुकराचे झाकण लावा. शिट्टी काढून घ्या. सुरवातीला १५ मिनिटे ठेवा.  नंतरच्या फेण्या उकडायला गॅस १० मिनिटे  ठेवा. प्रत्येक फेणी स्टँडला उकडायच्या वेळी कुकरामध्ये नवीन पाणी घाला. जसे आपण इडली उकडतो तसेच उकडायचे आहे. नंतर गॅस बंद करून ५ मिनिटांनी आतील फेण्याचा स्टँड काढा. त्यातील प्रत्येक पत्रा एका सुती कापडावर उपडा करा. पाण्याच्या साहाय्याने पापड्या सोला. पापडी सोलताना ती तुटत नाही याची काळजी घ्या. यासाठी नखाने सर्व बाजूने फेणी सोडवा. नंतर फेणी सोलताना फेणीच्या मागे पाणी घालून ती आपोआप सुटेल. फेणी सोलली की ती लगेच प्लॅस्टिकच्या जाड कागदावर पसरवा आणि कडक उन्हात वाळवा. पूर्णपणे फेणी वाळली की तळून खा. सोबत भाजलेले शेंगदाणे हवेत. ही फेणी भाजून पण छान लागते.

चित्र अनुक्रमे तांदुळाचे दळलेले पीठ, कुकरच भांडे उपडे करून पसरवलेली फेणी, शिजवून सोडवलेली ओली फेणी, वाळवलेली फेणी व तळलेली फेणी.

फेणी म्हणचे तांदुळाची पापडी. फेणी हे नाव दिले आहे ते माहीत नाही. फेणी करण्याचा स्टँड विकत मिळतो. त्यात ६ गोलाकार पत्रे येतात. हे पत्रे १२ घ्यायचे म्हणजे फेण्या पटापट होतात.  तो नसला तर मी असा प्रयोग केला पण तो खूपच तापदायक आहे. एका वेळेला एकच फेणी होत होती. कुकराचे भांडे उपडे करून मी फेणी पसरवली व ती वाफेवर शिजवली.

ओल्या फेण्या खायला खूपच छान लागतात. सोबत सायीचे आंबट दही घ्या.

सौ आई