भाषाःआग्री, मराठी
आज मना जरा बरा वाटला
स्त्री-जल्मावर कोनीतरी बोतला
पोरां हंत तीन मला
पन नवरा रोज जातो शेन खायाला
लोक लय मानतात त्येला
पन रोज मरतो मला,
लय घान घान बोलतो मला
वर झोंबतो शरीराला
कोनला कं सांगू
सहा मैने कोंडली यानं मला
जेवान तर सोराच,
झाऱ्यालाबी जाऊ दिली नाई मला
कंईच ईलाज चालंना
तवा कसातरी कलवला भावासला
आला बिचारा, मना घेवून गेला
एक दिवस जेलात बी टकला नवऱ्याला
अता वरीस व्हायाला आला
मी एकटीच ऱ्हातो माहेराला
पोरांची लय आठवन येते
त्यो बोलतो, दुसरी आई आनतो पोरानला
म्या त्येच्या दारात मरायला तयार हाये
पन बोलतो,
जशी आग लावत गेलीस तशी विझवत ये,
लफरी याची, अन आग मिनी लवली बोलतो
जीव तुटतो
पोरां शालेन जाईत न्हाईत
निखले हाल चालले हाईत
मोठा बोलतान, लगला बीर प्यायाला
शेवटला कलवला डॉक्टरमामाला
मामा त्याच्या पाया परला
बोलला, बुवा मारू नको रं पोरीला
मी संगतो त्यानला केस मागे घेयाला
तर माझा नवरा बोलला
डॉक्टर चूक झाली त मारीन बायकोला
मामा पन हारला,
बोलला, अग पोरी,
कसा सांगू मी तुला खड्ड्यांन ऊरी मारायला
पोरी माफ कर मला
गुन्हेगाराची साथ देतो समाज आपला
हातपाय गाळू नकोस
तूच धडा शिकव त्याला
काय वाट्टेल ते झाले तरी
हा मामा हाये तुझी साथ द्यायला.